उमरेड प्रतिनिधी : अनिल पवार
दि. १९ ऑगस्ट २०२५
उमरेड तालुक्यातील चांपा, हळदगाव, परसोडी, भिवापूर,उटी, सायकी आणि आसपासच्या गावांमध्ये क्रशर प्लांटमधील सातत्याने होणाऱ्या हेवी बोर ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांच्या जीवनावर गंभीर संकट कोसळले आहे. या स्फोटांमुळे अनेक घरांना मोठमोठ्या भेगा पडल्या असून, जमीन भूकंपासारखी हादरत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी सरपंच अतिश पवार यांनी याबाबत उमरेड तहसीलदारांना निवेदन देऊन तात्काळ कारवाई आणि नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
हळदगाव आणि परसोडी परिसरातील डझनभर क्रशर प्लांटमधून दररोज होणाऱ्या हेवी बोर ब्लास्टिंगमुळे अनेक कुटुंबांचे जीवन धोक्यात आले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाल्याचे विष्णू पांडुरंग कुलसंगे यांनी सांगितले, “आमच्या घराच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. दररोजच्या स्फोटांमुळे घर कधीही कोसळेल, अशी भीती वाटते.” प्रकाश मुकुंदा वलके यांनीही याच भावना व्यक्त करत म्हटले, “हेवी ब्लास्टिंगमुळे आमचे घर राहण्यायोग्य राहिले नाही. प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, नाहीतर मोठी दुर्घटना घडू शकते.”सत्यपाल शामराव आडे यांनी संताप व्यक्त करत सांगितले, “क्रेशर प्लांटच्या स्फोटांमुळे आमच्या घरांचे नुकसान झाले आहे. आम्हाला रात्री झोप येत नाही, कारण कधी काय होईल याची खात्री नाही.” सुधाकर लहू कुलसंगे यांनीही याला दुजोरा देत म्हटले, “आमच्या मुलांच्या सुरक्षेची चिंता वाटते. प्रशासनाने आमच्या नुकसानीची भरपाई करावी आणि ब्लास्टिंग बंद करावी.” वंदना राजहंस मेश्राम यांनी सांगितले, “आमच्या घराला पडलेल्या भेगा पाहून आम्ही हादरलो आहोत. ही परिस्थिती असह्य झाली आहे.”
अक्षय चंद्रमणी सहारे यांनी चिंता व्यक्त करत म्हटले, “हेवी ब्लास्टिंगमुळे जमीन हादरते, जणू भूकंप होत आहे. आमच्या घरांचे नुकसान झाले असून, यापुढे मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.” किलेश किशोर कुशराम यांनीही याला पाठिंबा देत म्हटले, “प्रशासनाने आमच्या व्यथा ऐकाव्या आणि तात्काळ उपाययोजना कराव्या.” रणवीर बाजीराव आडे यांनीही प्रशासनावर नाराजी व्यक्त करत सांगितले, “आमच्या घरांचे नुकसान होत आहे, पण कोणीही जबाबदारी घेत नाही. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे.”
या ब्लास्टिंगमुळे केवळ घरांचे नुकसानच झाले नाही, तर धूळ आणि खराब रस्त्यांमुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवनही असह्य झाले आहे.
अतिश पवार यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “क्रशर प्लांटच्या हेवी ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. घरांना पडलेल्या भेगा आणि दररोजच्या स्फोटांमुळे लोक भयभीत आहेत. प्रशासनाने त्वरित कारवाई करून ब्लास्टिंग बंद करावी आणि नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी.” ग्रामस्थांनी पवार यांच्या या प्रयत्नांचे स्वागत केले असून, प्रशासन तात्काळ कारवाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
क्रेशर प्लांटच्या अनियंत्रित ब्लास्टिंगमुळे होणारे नुकसान आणि ग्रामस्थांचे हाल थांबवण्यासाठी प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.