पुणे प्रतिनिधी
दि. २० ऑगस्ट २०२५
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहर आणि परिसरात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. पुणे विभागासाठी हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
कालपासून खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर या धरणांतून विसर्ग वाढवण्यात आला आहे. काल रात्री ७ वाजता खडकवासला धरणातून ३५,५१० क्युसेक, तर आज सकाळी १० वाजता हा विसर्ग वाढवून ३९,१३८ क्युसेक करण्यात आला. हा यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक विसर्ग ठरला आहे.
विसर्गामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या परिसरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंहगड रोडवरील एकता नगरी परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये आणि पार्किंगमध्ये कमरेइतकं पाणी साचलं आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या तुकड्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत.
धरण क्षेत्रात अजूनही पाऊस सुरूच असल्यामुळे विसर्गामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना आणि शहरी भागातील नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
कालच्या पावसाचे आकडे:
खडकवासला: ७१ मिमी
पानशेत: १८१ मिमी
वरसगाव: १६५ मिमी
टेमघर: १८६ मिमी
बाधित भाग:
नारायण पेठ
विठ्ठलवाडी
पुलाची वाडी
कामगार पुतळा
शिवाजीनगर
कसबा पेठ (आंशिक)
बाधित पूल:
बाबा भिडे पूल
विठ्ठल रखुमाई मंदिर परिसर
डेंगळे पूल
प्रशासन सतर्क असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदीकाठी जाणे टाळावे आणि अधिकृत मार्गदर्शनानुसारच हालचाल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास आणखी रेस्क्यू मोहिमा राबवाव्या लागण्याची शक्यता आहे.