वाशिम प्रतिनिधी :
२० ऑगस्ट २०२५
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट शेतात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आश्वासन दिलं की, “शेतकरी हा आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे. शासन कोणत्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवणार नाही. आम्ही सर्वतोपरी मदत करू.”
पंचनामे तात्काळ पूर्ण करा – प्रशासनाला आदेश
पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तातडीने नुकसानग्रस्त भागात पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
“एकही शेतकरी मदतीपासून वगळला जाऊ नये, हेच आमचं उद्दिष्ट आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
प्रत्यक्ष पाहणी आणि शेतकऱ्यांशी संवाद
पालकमंत्री भरणे यांनी रिसोड तालुक्यातील महागाव, बाळखेड, वाकद, शेलूखडसे, पिंपरखेड, मसलापेन तसेच मालेगाव तालुक्यातील राजुरा या गावांना भेट दिली.
त्यांच्यासोबत आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण, इतर वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.
शेतकरी बांधवांच्या अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या आणि थेट शेतात जाऊन पिकांचे नुकसान पाहिले.
“शासन आपल्या सोबत आहे” – पालकमंत्र्यांचा दिलासादायक संदेश
“अतिवृष्टीमुळे शेती, घरे आणि सार्वजनिक रचना यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कार्य तत्परतेने पार पाडावं. शेतकऱ्यांना दिलासा देणं हे आमचं प्रमुख कर्तव्य आहे,” असा ठाम संदेश पालकमंत्र्यांनी दिला.
“प्रत्येक गावातून मिळणारा अहवाल वेळेत शासनाकडे पोहोचवला जाईल आणि मदतही तत्काळ दिली जाईल,” असं त्यांनी अधोरेखित केलं.
अधिकाऱ्यांची उपस्थिती
या पाहणी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर, जिल्हा कृषी अधीक्षक अनिता महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या संकटातही शासन त्यांच्या सोबत उभं आहे, हा विश्वास या भेटीद्वारे बळकट झाला आहे.
“धीर सोडू नका, शासन तुमच्या पाठीशी आहे,” हा पालकमंत्र्यांचा संदेश सध्याच्या संकटात शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे.