कल्याण प्रतिनिधी :
दि. २० ऑगस्ट २०२५
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाला जबर झटका दिला आहे. ठाकरे गटातील माजी नगरसेवक व काही महत्त्वाचे पदाधिकारी शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत सामील झाले.
“कल्याण ग्रामीणमधील अनेक पदाधिकारी आणि सरपंच आज शिवसेनेत पुन्हा परतले आहेत. ते आमच्याच कुटुंबातील होते. काही काळ वेगळे गेले, पण आता परत आले आहेत. त्यांना तिथे करमत नव्हतं आणि मलाही त्यांच्यावाचून करमत नव्हतं,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
“हे सगळे पदाधिकारी माझ्या खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात सक्रिय होते. त्यामुळे त्यांच्याशी आधीपासूनच जिव्हाळ्याचं नातं होतं,” असेही ते म्हणाले.
“विकास आणि विश्वास आमचा अजेंडा”
एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं की, “महायुतीचा प्रमुख अजेंडा म्हणजे विकास. सामान्य जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हेच आमचं उद्दिष्ट आहे. हे पदाधिकारी देखील हाच विश्वास घेऊन आमच्यात आले आहेत. त्यांच्या भागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शासन कोणतीही कमीपणा दाखवणार नाही.”
“शब्द एकदा दिला, म्हणजे निभावणारच”
“शिवसेना कल्याण-डोंबिवलीत पूर्वीही मजबूत होती, आता ती अधिक बळकट होईल. मी दिलेला शब्द कधीच फिरवत नाही, हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. महायुतीला स्थानिक निवडणुकीत मोठा विजय मिळणार आहे,” असं शिंदे म्हणाले.
“काम करणाऱ्यांनाच जनता पसंती देणार”
शिंदेंनी विरोधकांवरही निशाणा साधला. “कोण पुढे जाणार, कोण मागे राहणार हे जनता ठरवते. जी माणसं काम करतात त्यांनाच जनता संधी देते. घरात बसणाऱ्यांना जनता घरीच ठेवेल. महाविकास आघाडी सरकारने विकासाला स्थगिती दिली होती, ती सर्व अडथळे आम्ही हटवले. आता ‘समृद्धी सरकार’ राज्यात आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.