मुंबई प्रतिनिधी :
२१ ऑगस्ट २०२५
बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीचा स्पष्ट पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजकारणात एक नवे वळण दिसून आलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली आहे. दोघांमध्ये तब्बल अर्ध्या तासाहून अधिक वेळ चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. ही भेट निवडणुकीतील पराभवानंतर लगेचच घडल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
पराभवाने ठाकरे युतीला धक्का
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनेलचा पुरता पराभव झाला. एकही जागा न जिंकता त्यांना परतावे लागले. या निवडणुकीकडे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘टेस्ट केस’ म्हणून पाहिले जात होते. परंतु या पराभवाने दोघांच्या युतीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करण्याचा इशारा दिला होता. अशात राज ठाकरे यांनी फडणवीसांची अचानक भेट घेणं, यामागे राजकीय डावपेच असल्याचं बोललं जात आहे.
भेटीचं कारण स्पष्ट नाही, पण चर्चांना उधाण
गुरुवारी सकाळी सुमारे ९.३० च्या सुमारास राज ठाकरे ‘वर्षा’वर पोहोचले. या भेटीचं ठोस कारण जाहीर करण्यात आलेलं नसले तरी ती वेळ आणि पार्श्वभूमी पाहता राजकीय विश्लेषक विविध तर्क लावत आहेत. काहीजणांच्या मते, ही चर्चा मुंबईतील प्रशासकीय प्रश्नांशी संबंधित होती, तर काहींना वाटतं की ही भेट निवडणूक पराभवाशी संबंधित राजकीय समजुतीसाठी होती.
भाजपकडून पोस्टरबाजी; राज ठाकरेंना डावललं
या पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेना भवनासमोर पोस्टर लावून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला. ‘ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात’ असा मजकूर असलेल्या पोस्टरवर केवळ उद्धव ठाकरेंचा उल्लेख होता; राज ठाकरे यांचा फोटो जाणूनबुजून टाळण्यात आल्याचं दिसून आलं. यामुळे दोघांच्या एकतेबद्दल अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे.