पुणे प्रतिनिधी :
दि. २१ ऑगस्ट २०२५
सिंहगड किल्ल्यावर बुधवारी सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली. हैद्राबादहून पुण्याला फिरायला आलेला २४ वर्षीय तरुण तानाजी कड्याजवळून घसरून खोल दरीत कोसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गौतम गायकवाड असं या तरुणाचं नाव असून, तो मूळचा फलटण (जि. सातारा) येथील आहे.
घटनेनंतर तात्काळ पोलिस, वनविभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, गौतमचा शोध घेण्यासाठी रात्रभर शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र अद्याप तो सापडलेला नाही.
लघुशंकेसाठी गेल्यानंतर गायब
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गौतम आपल्या चार मित्रांसोबत हैद्राबादहून पुण्यात फिरण्यासाठी आला होता. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही मंडळी सिंहगडावर पोहोचली. संध्याकाळच्या वेळेस सर्वजण तानाजी कड्याच्या दिशेने फिरायला गेले.
त्यावेळी गौतमने आपल्या मित्रांना लघुशंकेसाठी थोडं दूर जात असल्याचं सांगितलं. मात्र बऱ्याच वेळानेही तो परत न आल्याने मित्रांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळात हवा पॉइंटजवळ त्याची चप्पल आढळून आली. पण तो स्वतः कुठेही दिसला नाही.
घाबरलेल्या मित्रांनी पोलिसांना दिली माहिती
परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येताच, मित्रांनी तात्काळ १०० नंबरवर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. हवेली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिलीप शिंदे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
हवेली आपत्ती व्यवस्थापन, मावळा जवान संघटना तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी शोध मोहिमेत सहभागी झाले आहेत.
वाऱ्याचा वेग, निसरडी जमीन – अपघाताचा संशय
सिंहगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस व जोरदार वारे सुरू आहेत. त्यामुळे, वाऱ्याचा जोर व निसरडी जमिन यामुळे गौतमचा तोल जाऊन तो दरीत घसरून पडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
रात्री अंधार आणि पावसामुळे शोधकार्य थांबवावं लागलं होतं. गुरुवारी सकाळी सहा वाजता पुन्हा शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.
सिंहगड परिसरात चिंता आणि प्रार्थना
घटनेनंतर सिंहगड परिसरात पर्यटक आणि स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गौतम सुखरूप मिळावा, यासाठी युद्धपातळीवर शोध कार्य सुरू असून प्रशासनही सतर्क आहे.