मुंबई प्रतिनिधी :
दि. २१ ऑगस्ट २०२५
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असताना, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
“सप्टेंबरपर्यंत शिंदेंचा राजकीय भाव चढेल”
दमानिया म्हणाल्या, की “सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचा राजकीय ‘भाव’ या काळात वाढताना दिसेल,” असा दावा त्यांनी केला. हे वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचं मानलं जात आहे.
उपराष्ट्रपती निवडणूक आणि फडणवीसांची भूमिका
त्याचबरोबर, केंद्रात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएतील विसंवादाच्या चर्चांनाही त्यांनी दुजोरा दिला. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडीतील नेत्यांशी समन्वयाची भूमिका देण्यात आली असावी, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
राज ठाकरे–फडणवीस भेट आणि उद्धव ठाकरेंवर टिका
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला अपयश आल्यावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांची भेट घेतली. यावर बोलताना, अंजली दमानिया म्हणाल्या, “उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांना काहीही भविष्य दिसत नाही, त्यामुळेच ते भाजपच्या जवळ जात आहेत. ते आपला राजकीय ‘भाव’ वाढवत आहेत, पण उद्धव ठाकरेंशी त्यांना प्रत्यक्ष युती करायची इच्छा नाही.”
त्यांनी पुढे टोला लगावत म्हटलं, “राज ठाकरे हे एक दिवस उद्धव ठाकरेंना तोंडघशी पाडतील, ही वेळ फक्त येण्याची वाट पाहत आहे.”
राजकीय हालचालींना वेग
राज्यात निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय गठजोड, रणनीती, आणि नेत्यांतील हालचालींना वेग आला आहे. अशात दमानियांच्या वक्तव्याने अनेक नव्या चर्चांना आणि तर्कवितर्कांना हात मिळाला आहे.