पुणे प्रतिनिधी :
दि. २१ ऑगस्ट २०२५
बॉलिवूडचा चर्चेत असलेला चित्रपट ‘जॉली एलएलबी ३’ अजून प्रदर्शितही झाला नसताना कायदेशीर अडचणीत सापडला आहे. पुण्यातील दोन वकिलांनी या चित्रपटाविरोधात न्यायालयात धाव घेतली असून, चित्रपटातील काही दृश्ये वकिलांची आणि न्यायव्यवस्थेची बदनामी करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
पुण्याचे अॅड. वाजेद खान आणि अॅड. गणेश म्हस्के यांनी ‘जॉली एलएलबी ३’ च्या टीझरनुसार न्यायालयाचा अवमान होत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, टीझरमध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी हे वकीलांच्या वेशात विनोदी अंदाजात प्रमोशन करताना दिसत आहेत. त्यामुळे वकिली पेशाची प्रतिमा समाजात चुकीच्या पद्धतीने सादर होत आहे.
न्यायालयाची भूमिका आणि पुढील सुनावणी
पुण्याच्या १२ व्या ज्युनिअर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश जे. जी. पवार यांनी यासंदर्भात सुनावणी करत अभिनेता अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि चित्रपट निर्मात्यांना समन्स बजावले आहे. त्यांना २८ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जॉली एलएलबी ३ ला प्रदर्शनापूर्वीच कायदेशीर अडथळा
‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्याआधीच न्यायालयीन कारवाईमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वकिली पेशाचा अवमान झाला का, यावरून सध्या सोशल मिडिया आणि कायदेशीर वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
वकिलांची तीव्र प्रतिक्रिया
यासंदर्भात अॅड. वाजेद खान यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, टीझरमध्ये कलाकार वकिलांचा पोशाख घालून थट्टा करताना दिसतात, जे इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे वकिली व्यवसायाची प्रतिमा मलिन करतं. त्यामुळे त्यांनी कोर्टात याचिका दाखल केल्याचं स्पष्ट केलं.
पूर्वीही झाला होता वाद
ही पहिली वेळ नाही. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या काळातही वाद निर्माण झाला होता. ‘जॉली एलएलबी ३’ विरोधात अजमेर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनेही तक्रार दाखल करण्यात आली होती. तिथेही चित्रपटातील काही दृश्यांमुळे वकिलांची प्रतिमा खराब होत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला होता.
चित्रपटाच्या प्रचारातील दृश्यांमुळे निर्माण झालेला हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. आता २८ ऑगस्ट रोजी न्यायालयात काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.