मुंबई प्रतिनिधी :
२१ ऑगस्ट २०२५
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत मानल्या जाणाऱ्या जीएसबी सेवा मंडळाने यंदा आपल्या गणेशोत्सवासाठी ४७४ कोटी रुपयांचा विमा कव्हर घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या विम्यात ७४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सोनं, चांदी आणि सेवकांचेही संरक्षण
GSB मंडळाने घेतलेल्या या विम्यामध्ये फक्त बाप्पाच्या दागिन्यांपुरतेच नव्हे, तर पुजारी, आचारी, स्वयंसेवक, सुरक्षा रक्षक यांच्यासाठीही वैयक्तिक अपघात विमा कव्हर समाविष्ट आहे. या वर्षीच्या गणेशोत्सवात बाप्पाला सजवण्यासाठी ६७ कोटी रुपयांचं सोनं आणि ३२५ किलोहून अधिक चांदी वापरण्यात येणार आहे. या मौल्यवान दागिन्यांमुळेच विम्याची रक्कम वाढल्याचं सांगितलं जात आहे.
प्राकृतिक आपत्त्याही कव्हरमध्ये
या विमा पॉलिसीत आग, भूकंप, अपघात आणि अन्य आपत्तीजन्य घटनांमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीचाही विचार करण्यात आला आहे. न्यू इंडिया अश्युरंस कंपनी ने ही विमा पॉलिसी जारी केली असून, विम्यासाठी किती प्रीमियम भरला गेला आहे, याची माहिती मात्र गोपनीयतेच्या कारणास्तव जाहीर करण्यात आलेली नाही.
श्रीमंतीसोबत सेवा कार्यही ठळक
मुंबईच्या किंग्ज सर्कल परिसरातील हे मंडळ फक्त भव्यतेसाठीच नव्हे, तर सामाजिक उपक्रमांसाठीही ओळखलं जातं. गणेशोत्सवाच्या पाच दिवसांत येथे २४ तास अखंड पूजा आणि अन्नदान सुरू असते. दररोज सुमारे २० हजार आणि एकूण एक लाखांहून अधिक भक्तांना भोजनप्रसाद दिला जातो. केळीच्या पानावर प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.
मागील वर्षीचा विक्रमही मागे
२०२३ मध्ये विमा: ₹३६०.४० कोटी
२०२४ मध्ये विमा: ₹४०० कोटी
२०२५ मध्ये विमा: ₹४७४ कोटी
या क्रमवार वाढीवरून जीएसबी मंडळाच्या सजगतेचा आणि सुरक्षिततेकडे दिलेल्या प्राधान्याचा अंदाज सहज लावता येतो.
मुंबईतील जीएसबी सेवा मंडळाने यंदाही भव्यतेसोबत सुरक्षा आणि सेवा यांचा उत्तम मेळ साधत इतर मंडळांसमोर एक आदर्श उभा केला आहे. फक्त दागिन्यांचेच नव्हे तर मानव संसाधनांचेही संरक्षण करणारे हे विमा कव्हर देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.