मुंबई प्रतींनिधी :
दि. २२ ऑगस्ट २०२५
क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या लग्नाच्या तयारीत आहे. नुकताच त्याचा साखरपुडा पार पडला. या पार्श्वभूमीवर त्याची आई, अंजली तेंडुलकर यांनी मुंबईजवळील विरारमध्ये एक नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. ही माहिती मालमत्तेच्या नोंदणी कागदपत्रांतून समोर आली आहे.
३२ लाखांचा व्यवहार, स्टॅम्प ड्युटीत सवलत
अंजली तेंडुलकर यांनी विरारच्या ‘पेनिन्सुला हाइट्स’ या इमारतीत ३२ लाख रुपये किमतीचं ३९१ चौरस फूट आकाराचं अपार्टमेंट खरेदी केलं आहे. या व्यवहारासाठी त्यांनी १.९२ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरलं. महिला खरेदीदार असल्यामुळे त्यांना एक टक्क्याची सवलतही मिळाली आहे. महाराष्ट्रात ही सुविधा महिलांसाठी लागू आहे.
३० मे रोजी नोंदणी, आता माहिती उघड
कागदपत्रांनुसार, हा व्यवहार ३० मे २०२५ रोजी रजिस्टर झाला होता. म्हणजेच अर्जुनच्या साखरपुड्याच्या अगोदरच ही मालमत्ता खरेदी झाली होती. मात्र यासंबंधीची माहिती नुकतीच उघड झाली आहे.
विरारमधील घरांची मागणी वाढतेय
विरार हे मुंबई महानगर क्षेत्रात येतं आणि पालघर जिल्ह्यात स्थित आहे. स्थानिक रिअल इस्टेट एजंट्सच्या मते, सध्या येथे घरांच्या दरात वाढ झाली असून चौरस फूट दर ६००० ते ९००० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे अंजली तेंडुलकर यांची ही गुंतवणूक युक्तीची मानली जात आहे.
अर्जुन-सानिया यांचा साखरपुडा गुपचूप पार
दरम्यान, अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा काही दिवसांपूर्वीच सानिया चंडोक हिच्यासोबत पार पडला. सानिया ही प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात असून, साराची ती जुनी मैत्रीण आहे. सचिनची लेक साराने दोघांची गाठभेट घालून दिली आणि नंतर ते रिलेशनशीपमध्ये अडकले. हा सोहळा अत्यंत खासगी स्वरूपात मुंबईत पार पडला. दोन्ही कुटुंबीय आणि जवळचे मित्रच यावेळी उपस्थित होते.