पुणे प्रतिनिधी :
दि. २२ ऑगस्ट २०२५
राज्याचे नव नियुक्त कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज कृषी विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय व्यवस्थापन संस्थेत ही बैठक संपन्न झाली. कृषी मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ही त्यांची पहिली औपचारिक बैठक होती. विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह मंत्रालयातील अधिकारी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित विविध घटकांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
शेतकरी केंद्रस्थानी ठेवून योजना राबवाव्यात – भरणेंचा स्पष्ट संदेश
बैठकीदरम्यान कृषीमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांचे हित हेच आपल्या कामाचे केंद्रबिंदू असले पाहिजे, असा स्पष्ट संदेश दिला. “शेतकरी जगला, तरच देशाचा विकास होईल. त्यामुळे कृषी योजनांची आखणी करताना शेतकऱ्याच्या गरजांचा विचार केंद्रस्थानी असला पाहिजे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “नवीन तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कृषी विभागाने करावा. आपले प्रधान सचिव टेक्नोसेव्ही असून त्यांचा अनुभव ‘पोकरा’ प्रकल्पामधून आलेला आहे. त्याचा उपयोग विभागाच्या कामात नक्कीच होईल.”
‘किसान कॉल सेंटर’ ची संकल्पना पुढे
शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘किसान कॉल सेंटर’ सुरू करण्याची सूचना भरणे यांनी यावेळी केली. “शेतकरी जेव्हा संकटात असतो, तेव्हा त्याला त्वरित सल्ला आणि मदतीची गरज असते. त्यासाठी एक समर्पित कॉल सेंटर आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
चांगल्या कामाची प्रशंसा, हलगर्जीपणावर कारवाई
कृषी सहायक, जे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सेवा देतात, त्यांना सुद्धा अत्याधुनिक सोयी सुविधा दिल्या जातात असे ते म्हणाले. त्यांनी विभागाच्या डिजिटायझेशनवर भर देण्याची सूचना दिली. मात्र, कोणताही कर्मचारी कामात हलगर्जीपणा दाखवेल, तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल, हेही त्यांनी ठणकावून सांगितले. उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक आणि सन्मान केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर त्वरित उपाय
गेल्या काही आठवड्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यावर बोलताना कृषीमंत्र्यांनी महसूल विभागाशी समन्वय साधून तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
बैलपोळ्याच्या शुभेच्छा
बैठकीच्या शेवटी त्यांनी बैलपोळ्यानिमित्त राज्यातील सर्व कृषी बांधवांना शुभेच्छा दिल्या आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरेल असे कार्य करावे, असा संदेश दिला.
बैठकीस अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित
या बैठकीला प्रधान सचिव श्री. रस्तोगी, कृषी आयुक्त डॉ. वसेकर, संचालक अंकुश माने, अशोक किरनाळी, सफिक नाईकवाडी, विनयकुमार आवटे, सुनिल बोरकर यांच्यासह जिल्हास्तरीय कृषी अधिकारी, ‘महाबीज’चे प्रतिनिधी आणि इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.