मुंबई प्रतिनिधी :
दि. २५ ऑगस्ट २०२५
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असून विशेषतः कोकणात जोरदार सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सोमवारी, २५ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. यातील रायगड जिल्ह्यात २८ ऑगस्ट रोजी काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय कोकण-गोवा परिसरात २५ ते ३० ऑगस्टदरम्यान सतत पावसाची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्येही पावसाची चाहूल लागली असून, मंगळवार व बुधवार (२६ व २७ ऑगस्ट) रोजी या भागांत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात मुंबईत ढगाळ वातावरणासोबत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच ठाण्यात गुरुवारी (२८ ऑगस्ट) देखील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि मराठवाडा भागातही विजांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये बुधवार आणि गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे धुळे, जळगाव आणि नंदुरबार या भागांत सोमवारपासून यलो अलर्ट जारी करण्यात आला असून घाटमाथ्याच्या भागांतही पावसाच्या सरींचा जोर राहू शकतो.
मराठवाड्यातील परभणी, लातूर (सोमवार), हिंगोली, नांदेड (सोमवार व मंगळवार) आणि जालना (बुधवार) येथे विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच विदर्भात मंगळवारपासून पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या पावसाच्या वाढत्या शक्यतेमागे बंगालच्या उपसागरातील सक्रीय मॅडन-ज्युलियन ऑस्सिलेशन (MJO) घटक आणि ईशान्य मध्य प्रदेशजवळ तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे मुख्य कारण असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील वातावरणात बदल होत आहे.
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सर्व नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. विशेषतः घाटमाथ्यावर ट्रेकिंग किंवा प्रवास करण्याची योजना असेल, तर हवामानाची स्थिती तपासूनच पुढे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.