जालना प्रतिनिधी :
दि. २६ ऑगस्ट २०२५
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सरकारची चिंता वाढली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता, सरकारने संकट टाळण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) राजेंद्र साबळे यांनी आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. उपोषण पुढे ढकलण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.
राजेंद्र साबळे हे आज दुपारी साधारणतः १२ वाजता अंतरवालीत पोहोचले. त्यांनी गणेशोत्सव काळात मुंबईत होणारी गर्दी, सुरक्षेची संभाव्य अडचण या गोष्टींचा उल्लेख करत, उपोषण काही दिवसांनी घ्यावे, अशी विनंती केली. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष दिलं जाईल, तेव्हाच काही विचार करू, अन्यथा आम्ही नियोजित वेळेनुसारच मुंबईकडे मार्गस्थ होणार आहोत, असा निर्वाणीचा इशारा दिला.
“उपोषणाचा कालावधी पुढे ढकलण्याची विनंती करण्यासाठी आणि अंतरवाली ते मुंबई मार्गाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी मी या भेटीला आलो होतो,” असं राजेंद्र साबळे यांनी स्पष्ट केलं. परंतु, जरांगे यांनी मात्र आपल्या मागण्या मान्य न झाल्यास कोणतीही माघार घेणार नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केलं.
मनोज जरांगे म्हणाले, “आम्ही शांततेत आणि लोकशाही मार्गाने उपोषण करू इच्छितो. मुंबईतील कोणत्याही गणेश मंडळाच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण होणार नाही. आझाद मैदानात गणेश विसर्जन होत नाही, त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये. सरकारने आम्हाला जो मार्ग सांगेल, त्या मार्गाने आम्ही येऊ.”
दरम्यान, जरांगे यांची भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचे राजेंद्र साबळे यांनी सांगितले. आता पुढील काही तासांत सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.