अहिल्यानगर प्रतिनिधी :
दि. २८ ऑगस्ट २०२५
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आपल्या हजारो समर्थकांसह अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघाले असताना त्यांच्या ताफ्यावर बुधवारी रात्री एका धक्कादायक घटनेत दगडफेक करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यात कल्याण मार्गावर ही घटना घडली. काही अज्ञात समाजकंटकांनी त्यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक केली असून, यामध्ये स्कॉर्पिओ आणि पिकअपच्या काचा फुटल्या. एका आंदोलकास किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आंदोलनाचे समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे. मात्र, हल्ला करणाऱ्याचे नेमके कारण आणि पार्श्वभूमी अद्याप स्पष्ट झालेली नाही.
मुंबईकडे सुरू आहे निर्धाराची यात्रा
मराठा समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण मिळावे, यासाठी ही आरपारची लढाई असल्याचे स्पष्ट करत मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी सकाळी अंतरवाली सराटी येथून आपली यात्रा सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची पूजा आणि गणपतीची आरती करून त्यांनी यात्रा सुरू केली. महिलांनी त्यांचे औक्षण करून पाठवणी केली.
यात्रेचा पुढील टप्पा जुन्नर परिसरात असून, किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यानंतर ते शिवजन्मस्थळाला भेट देऊन मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेने प्रस्थान करतील, अशी माहिती समन्वयक संदेश बारवे यांनी दिली.
जुन्नरमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली असून, त्यांचा लढा अधिक जोमाने पुढे जाण्याची शक्यता आहे.