मुंबई प्रतिनिधी :
दि. २८ ऑगस्ट २०२५ :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक फुलांना मागणी वाढत असताना बाजारात मोठ्या प्रमाणावर कृत्रिम फुलांचा वापर वाढला आहे. त्यामुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत असून त्यांना आर्थिक फटका बसतो आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढाकार घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र पाठवून कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
गणेशोत्सव, तसेच इतर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर फुलांचा वापर होतो. मात्र शेतकरी मेहनतीने पिकवत असलेल्या नैसर्गिक फुलांऐवजी बाजारात चीनमधून आयात केलेल्या प्लास्टिक व सिंथेटिक फुलांना मागणी वाढली आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यावर होत असून, त्यांना उत्पादन खर्चही परत मिळेनासा झाला आहे.
याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पर्यावरण, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र लिहून परिस्थितीचे गांभीर्य मांडले आहे. त्यांनी पर्यावरण विभागामार्फत तातडीने कायदेशीर पावले उचलून कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे.
कृत्रिम फुलांचा वाढता वापर फुलशेतीसाठी धोकादायक ठरतो आहे. शेतकऱ्यांची हरितगृहे रिकामी पडत आहेत, उत्पादन न विकल्याने नुकसान होते आहे, आणि संपूर्ण एक व्यवसाय संकटात आला आहे. शिवाय प्लास्टिक व सिंथेटिक पदार्थांमुळे पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होतो आहे.
ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृत्रिम फुलांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करत कृषिमंत्री भरणे यांनी ठोस भूमिका घेतली आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे राज्यातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.