मुंबई प्रतिनिधी :
दि. २६ ऑगस्ट २०२५ :
रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथे प्रस्तावित १४ कोटी रुपये खर्चाच्या सुपारी संशोधन केंद्राच्या कामांना लवकरात लवकर सुरूवात व्हावी, असे स्पष्ट निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाला दिले आहेत.
या संदर्भातील बैठक मंत्रालयात पार पडली. बैठकीला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वर्षा लड्डा-उंटवाल, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री भरणे म्हणाले, “दिवेआगरमध्ये होणाऱ्या सुपारी संशोधन केंद्रामुळे शेतकऱ्यांना उन्नत जातींची सुपारी रोपे उपलब्ध होणार असून, सुपारी उत्पादन क्षेत्राला वैज्ञानिक पाठबळ मिळेल. याच केंद्रात दर्जेदार आणि बुटक्या सुपारीच्या जातींचा विकास, आंतरपिक पद्धतीचे तंत्रज्ञान, रोपवाटिका, ग्रामविकास आराखडा, रोजगार निर्मिती असे अनेक उपक्रम राबवता येतील.”
त्यांनी दापोली कृषी विद्यापीठाला निविदा प्रक्रिया जलद पूर्ण करून काम लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले.
सुपारी संशोधन केंद्र पर्यटनालाही देईल चालना – मंत्री आदिती तटकरे
मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रकल्पाचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “दिवेआगर हे पर्यटनाचे महत्त्वाचे ठिकाण असून येथे उत्पादित होणारी रोठासुपारी दर्जेदार आहे. हे संशोधन केंद्र शेतकऱ्यांना फायदा देईलच, पण पर्यटकांनाही आकर्षित करणारे ठरेल.”
त्यामुळे हे केंद्र केवळ शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्था व पर्यटनाच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.