दि. २८ ऑगस्ट २०२५
डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी
पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत क्रिकेटविषयक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यामुळे जगासमोर पुन्हा एकदा पाकिस्तानची मान खाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताशी थेट क्रिकेट मालिका न खेळण्याचा पवित्रा घेत पाकिस्तानने, ‘आम्ही भारताकडे कधीही भीक मागणार नाही’, असे थेट वक्तव्य करत आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात एक नवाच वाद उभा केला आहे.
पाकिस्तानचा दावा – “भारताशी मालिका खेळण्यासाठी विनंती नाही करणार!”
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं की, “भारताकडून मालिका खेळण्यासाठी यापुढे आम्ही कधीही विनंती करणार नाही. चर्चा आता केवळ समान दर्जावरच होणार आहेत.”
भारत-पाक तणाव आणि त्याचे पडसाद क्रिकेटवर
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नुकतेच स्पष्ट केले की, “कोणत्याही स्पर्धेतील थेट क्रिकेट मालिका सध्या शक्य नाही.” भारतातील कार्यक्रमांसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना परवानगी असली तरी पाकिस्तानमधील सामने परिस्थितीनुसार ठरवले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
भारताविरुद्ध मालिकेचा पाकिस्तानला होतो मोठा आर्थिक फायदा?
क्रिकेट विश्लेषकांच्या मते, भारतासोबत मालिका खेळल्यास पाकिस्तानला आयसीसीकडून मिळणाऱ्या रकमेपेक्षाही अधिक आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यामुळे पाकिस्तानचा आक्रमक पवित्रा हा फक्त राजकीय दिखावा असून पडद्यामागे अजूनही आर्थिक स्वार्थ मोठा आहे, असे बोलले जात आहे.
दोन देशांमधील थेट मालिका रद्द असल्या तरी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सामना टाळता येत नाही. आगामी आशिया कप टी-२०मध्ये १४ सप्टेंबरला भारत-पाक सामना अपेक्षित आहे. या स्पर्धेत दोघेही किमान तीन वेळा आमनेसामने येऊ शकतात.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक संबंध आणखी ताणले गेले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांवरही त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतोय. केंद्र सरकारनेही यावर आपली भूमिका ठामपणे मांडली असून, खेळाच्या नावाखाली राजकीय दबाव स्वीकारला जाणार नाही, असा इशारा दिला आहे.
पाकिस्तानला जागतिक स्तरावर पुन्हा एकदा नामुष्की?
भारताकडे झुकण्याची शक्यता नाकारताना पाकिस्तानने स्वतःसाठी परिस्थिती आणखी कठीण केली आहे. एकीकडे त्यांनी ‘आम्ही मागणी करणार नाही’ असे म्हणत कठोर भूमिका घेतली असली, तरी वास्तविकतेत भारताविना त्यांचा क्रीडा आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग अडखळलेला आहे.
भारताची पुढील प्रतिक्रिया काय?
पाकिस्तानने भारताविरोधात केलेल्या या थेट वक्तव्यानंतर आता सर्वांचे लक्ष भारत सरकार व बीसीसीआयच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.