इंदापूर प्रतिनिधी :
दि. ३० ऑगस्ट २०२५
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केले की, “मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, याबाबतीत कोणाचंही दुमत नाही. मात्र, हे आरक्षण कायमस्वरूपी टिकावं, याची खात्री करणे आवश्यक आहे.” इंदापूरमध्ये बोलताना भरणे यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल स्पष्ट केले की, सरकार आणि संबंधित समिती लवकरच या मुद्द्यावर योग्य तो निर्णय घेईल.
कृषी मंत्री भरणे यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की, “मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्व असलेल्या आंदोलनासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांची समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये लवकरच तडजोडीची प्रक्रिया सुरू होईल, आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल.”
काय आहे आंदोलनावर सरकारची भूमिका?
भरणे यांनी आंदोलनाच्या संदर्भात आणखी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर निर्णय होईल. तसेच मराठा विरुद्ध ओबीसी असा कोणताही वाद होणार नाही. वाद निर्माण होईल, असे कोणालाही करु देऊ नका.”
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान
याच वेळी भरणे यांनी नांदेड जिल्ह्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचीही माहिती दिली. “नांदेड जिल्ह्यात ३० ते ४० टक्के नुकसान झाले आहे. प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, आणि पंचनाम्याच्या अहवालावरून योग्य ती मदत सरकार कडून शेतकऱ्यांना दिली जाईल,” अशी माहिती भरणे यांनी दिली.