इंदापूर प्रतिनिधी :
दि. ३० ऑगस्ट २०२५
“आयुष्य जगायला आधार हवा आणि हा आधार देणारे हात होणं हेच खरं जीवन आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना आदराचे स्थान आहे.त्यांच्या हिताची काळजी घेणे, हे आपले सामाजिक कर्तव्य आहे” असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी प्रसंगी ते बोलत होते.
भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) व कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान इंदापूर तर्फे आयोजित दिव्यांग व वयोश्री योजनेतंर्गत इंदापूर तालुक्यात लाभार्थ्यांसाठी मोफत 2 दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.इंदापुर तालुक्यात अनेक दिव्यांग बांधव व अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना रोजच्या जीवनात छोट्या-छोट्या गोष्टींसाठी मोठा संघर्ष करावा लागतो. त्यांच्या या संघर्षाला थोडा दिलासा मिळावा म्हणून दिव्यांग व वयोश्री योजना राबवली जाते. त्याकरीता या शिबिरामध्ये दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांनी लाभार्थ्यांची शारीरिक तपासणी करून आवश्यक त्या सहाय्यक साधनांची (काठी, व्हीलचेअर, श्रवणयंत्र, चष्मे आदी) गरज नोंदवली. तपासणीनंतर पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत व्हीलचेअर, व्हीलचेअर विथ कमोड, काठ्या, कानाची मशीन, कंबरेचे, गुडघ्याचे पाठीचे आणि गळ्याचे पट्टे, बसण्याची गादी, कमोड चेअर ही साधने शासनामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हजारो ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधव या शिबिरात सहभागी झाले होते.
“आरोग्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. वयोमानामुळे किंवा अपंगत्वामुळे कोणीही समाजापासून मागे राहू नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना आदराचे स्थान असून त्यांच्या हिताची काळजी घेणे, हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. आजच्या या शिबिरातून हजारो लाभार्थ्यांना नवी ऊर्जा मिळणार असून दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी मोठा दिलासा मिळेल” अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, प्रतापराव पाटील, अरविंद वाघ, तसेच इंदापुर शहरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व लाभार्थ्यांची उपस्थिती होती.