मुंबई प्रतिनिधी :
दि. ०३ सप्टेंबर २०२५
आशिया कप २०२५ काही दिवसांत सुरू होणार असून, याआधी भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सगळ्यांना वाटत होतं तेच अखेर खरं ठरलं आहे – सूर्यकुमार यादव पुन्हा मैदानात परतला असून, तो या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे.
टीम इंडियाची निवड करण्यात आली असून, काही नवोदित खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या टी-२० क्रिकेटमधील निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आणि त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने काही चांगल्या कामगिरी दाखवल्या आहेत.
आता तो आशिया कपसारख्या मोठ्या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. सध्या तो नेटमध्ये जोरदार सराव करत आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो विविध प्रकारचे प्रभावी फटके मारताना दिसतो. त्याची फलंदाजी पाहून स्पष्ट होते की सूर्या पुन्हा फॉर्मात परतला आहे आणि महत्त्वाच्या स्पर्धेसाठी तयार आहे.
आयपीएल २०२५ नंतर सूर्यकुमार यादवची खेळाच्या मैदानातून काही काळाची विश्रांती झाली होती. पोटाच्या खालच्या भागातील दुखापतीसाठी त्याची जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याचा आशिया कपमध्ये सहभाग होणार की नाही, याबाबत साशंकता होती. पण आता त्याने पुनरागमन करत सर्वांना दिलासा दिला आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव हा एक आघाडीचा फलंदाज मानला जातो. मात्र कर्णधार झाल्यानंतर त्याची कामगिरी स्थिर राहिलेली नव्हती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याने कमी धावा केल्या, तसेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही तो फारसे चमकला नाही.
तरीही, आयपीएल २०२५ मध्ये सूर्यानं जबरदस्त खेळी केली. त्याने १६ सामन्यांत ७१७ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १६८ होता आणि सरासरी ६५. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर होता.
ही कामगिरी पाहता, सूर्या आता पुन्हा एकदा भारतीय संघासाठी मोठी ताकद ठरू शकतो, आणि आशिया कपमध्ये तो नेतृत्वाची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे.