मुंबई प्रतिनिधी :
दि. ०४ सप्टेंबर २०२५
महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि चक्रीय वातावरणामुळे राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
या हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात आजपासून (गुरुवार, ४ सप्टेंबर) पुढील चार दिवस मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतीमुसळधार सरी देखील कोसळू शकतात.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि पुणे जिल्ह्यांतील घाटमाथ्याच्या भागांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. या भागांमध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत काही भागांत जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात. मात्र, शनिवारी (अनंत चतुर्दशी – विसर्जनाचा दिवस) पावसाचा जोर काहीसा कमी होऊन हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. तरी पालघरमध्ये शनिवारीही काही भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता कायम आहे.
दक्षिण कोकणातही अलर्ट
रायगड जिल्ह्याला गुरुवार आणि शुक्रवारसाठी तर रत्नागिरीला गुरुवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांतही तुरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि विदर्भात काय स्थिती?
मराठवाड्याच्या बीड, हिंगोली, लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. वाऱ्याची तीव्रता वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांत आज पावसाचा जोर दिसून येईल, मात्र उद्यापासून पावसाचा प्रभाव कमी होईल.
गणेश विसर्जनानंतर पावसाचा जोर कमी होणार
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, अनंत चतुर्दशीनंतर म्हणजेच शनिवारीपासून राज्यभरात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस विशेषतः किनारपट्टी व घाटमाथा भागांत राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.