सोलापूर प्रतिनिधी :
दि. ५ सप्टेंबर २०२५
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांमधील वादग्रस्त फोन संभाषणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असतानाच, आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ज्यांच्यासाठी अजित पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले, त्या कार्यकर्त्यांसह १५ ते २० ग्रामस्थांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
करमाळा तालुक्यातील कुर्डु (जि. सोलापूर) गावात बेकायदेशीर मुरूम उपशाच्या विरोधात महसूल आणि पोलीस प्रशासन कारवाईसाठी गेले असता, तेथील काही ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अधिकारीविरोधात आक्रमक झाले. या गोंधळात, राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला आणि त्यांच्याशी महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांचा संवाद घडवून आणला.
या संभाषणात अजित पवार यांनी अधिकार्यांवर नाराजी व्यक्त करत, “तुम्हारी इतनी हिम्मत… मैं अॅक्शन लूंगा” असे शब्द वापरले होते. यानंतर संबंधित कॉलचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आणि व्यापक चर्चेचा विषय ठरला.
गुन्हा नोंदवण्यामागचं कारण
ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांच्या तक्रारीनुसार, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाणे यांच्यासह अनेक ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शेतकरी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी या प्रकाराचा निषेध करत, अजित पवार यांनी बेकायदेशीर मुरूम उपशाला समर्थन दिल्याचा आरोप केला. तसेच, महिला अधिकारी अंजना कृष्णा यांची माफी मागावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
सामाजिक माध्यमांवर व्हिडीओंचा पूर
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये ग्रामस्थ व कार्यकर्ते प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी उर्मट भाषा वापरताना दिसत आहेत. त्यामुळे यामागचे दबावाचे राजकारण कितपत गंभीर आहे, यावर आता चर्चा रंगू लागली आहे.