मुंबई प्रतिनिधी :
दि. ०८ सप्टेंबर २०२५
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदेसेनेनं हालचालींना वेग दिला आहे. पक्षात नव्याने ३२ विभागप्रमुख आणि ३ विधानसभा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. मात्र या नियुक्तींमुळे पक्षाला बळकटी मिळण्याऐवजी, पश्चिम उपनगरात अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे.
शिंदेसेनेनं शिवसेना (ठाकरे गट) मधून अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी आपल्या गोटात खेचले आहेत. पण आता पक्षांतर्गत दिलेल्या आश्वासनांना तडे जाऊ लागलेत. नव्या यादीत अपेक्षेप्रमाणे पद न मिळालेल्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत पक्षातून बाहेर पडण्याचाही इशारा दिला आहे.
विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातील जितेंद्र जानावळे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. “शिवसेनेत ३० वर्षे काम केल्यानंतर शिंदे गटात प्रवेश करताना विभागप्रमुख पद देण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं. पण आता मला केवळ विधानसभा प्रभारी पद देण्यात आलं. मी पुन्हा त्या जुन्या विभागप्रमुखांच्या अधीन राहून काम करणार नाही,” असं जानावळे यांनी स्पष्ट केलं.
गोरेगाव आणि दिंडोशी भागातील गणेश शिंदे यांनीही अशाच प्रकारच्या नाराजीचा सूर लावला. “ठाकरेसेनेविरुद्ध संघर्ष करत आम्ही इथपर्यंत आलो. पण पक्षाने दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे आमच्यासोबत असलेले कार्यकर्ते वेगळी भूमिका घेऊ शकतात,” असं इशारावजा वक्तव्य त्यांनी केलं.
चारकोप विधानसभा क्षेत्रात तर कोणतीही नियुक्तीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे इच्छुक असलेले संजय सावंत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष आहे. “आम्ही पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहोत,” असं सावंत यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा महापौर निश्चित असल्याचा दावा केला असताना, शिंदेसेना मुंबईत ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र विभागप्रमुखांच्या नियुक्तीने आलेली नाराजी पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते, असं जाणकारांचं मत आहे.