पुणे प्रतिनिधी :
दि. ०९ सप्टेंबर २०२५
पुण्यातील नाना पेठ परिसरात ५ सप्टेंबर रोजी घडलेल्या कोमकर हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा गँगवॉरचा भडका उडाला असून, या प्रकरणातील नवे धक्कादायक तपशील आता समोर येत आहेत. आयुष कोमकर उर्फ गोविंदा कोमकर या २३ वर्षीय युवकाचा भरवस्तीत गोळ्या घालून खून करण्यात आला. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना त्याचा लहान भाऊ अर्णव कोमकर याच्या डोळ्यांसमोर घडली. घटनास्थळी अर्णव जोरजोराने रडत असताना त्याची आई कल्याणी कोमकर धावत आली, पण तोवर सगळं संपलं होतं.
एका वर्षापूर्वीचा खून, आता बदला
ही हत्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणूनच केल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येला आता एक वर्ष पूर्ण झाले असून, त्याचा प्रमुख आरोपी गणेश कोमकर होता — म्हणजेच आयुषचा वडील. आता, कोमकर टोळीच्या प्रमुखाच्या मुलाचा खून होऊन पुन्हा गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष चिघळल्याचं दिसत आहे.
घटनास्थळी नेमकं काय घडलं?
५ सप्टेंबरच्या संध्याकाळी आयुष कोमकर आपल्या लहान भावाला ट्युशन क्लासहून घरी आणण्यासाठी गेला होता. अर्णव दररोजप्रमाणे सायंकाळी सात वाजता सलीम सरांचा ट्युशन क्लास संपवून बाहेर पडला. दोघं मिळून एक्टिवा स्कूटरवरून घरी येत होते. रात्री साडेसातच्या सुमारास ते लक्ष्मी निवास या त्यांच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये पोहोचले.
कल्याणी कोमकर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, “आयुषने गाडी पार्क करत असतानाच, पाठीमागून दोन अनोळखी तरुण पळत आले. त्यांनी आयुषकडे पाहिलं आणि काही न म्हणता बंदूक काढून गोळ्या झाडल्या.” हे सर्व अर्णवने प्रत्यक्ष पाहिलं आणि तो भीतीने जोरजोराने रडत होता. त्या गोंधळात शेजारी राहणारे दुडूम काका आणि अश्विनी यांनी तात्काळ कल्याणी कोमकर यांना फोन करून घटनेची माहिती दिली.
सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शी साक्ष महत्त्वाची ठरली
पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, हल्लेखोर दिसून आले. हे फुटेज कल्याणी कोमकर यांना दाखवल्यावर त्यांनी दोघांना ओळखले. ते आंदेकर टोळीचेच सदस्य असल्याची खात्री झाली. याशिवाय, प्रत्यक्षदर्शी म्हणून अर्णव कोमकर याचा जबाब अत्यंत महत्त्वाचा ठरला.
आरोपींची नावं, टोळीचं जाळं
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या १३ आहे. त्यामध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर (वय ६०) आणि त्याचा मुलगा कृष्णराज उर्फ कृष्णा आंदेकर (वय ४१) यांचा समावेश आहे. तसेच, शुभम, अभिषेक, शिवराज, लक्ष्मी आंदेकर, तसेच वाडेकर कुटुंबातील तिघं, आणि अमन पठाण उर्फ खान, सुजल मेरगु, यश पाटील, अमित पाटोळे अशी नावे यात आहेत.
यातील यश पाटील आणि अमित पाटोळे यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असून, त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हल्ल्यातील दोन प्रमुख आरोपी — अमन पठाण आणि यश पाटील — यांनी आयुषवर गोळ्या झाडताना “इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर चालतात!” असं म्हणत धमकी दिल्याचंही तपासात समोर आलं आहे.
पहाटे सहा जणांना अटक
प्रत्यक्षदर्शी, सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिस तपासाच्या आधारे अखेर आंदेकर टोळीतील सहा सदस्यांना पुणे पोलिसांनी पहाटे अटक केली आहे. यामध्ये बंडू आंदेकरलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, पुढील तपास अधिक गतीने सुरू झाला आहे.
गँगवॉरचं पुन्हा डोकं वर
ही घटना म्हणजे केवळ एक व्यक्तीचा खून नसून, दोन टोळ्यांतील दीर्घकालीन वैराची परिणती आहे. आंदेकर आणि कोमकर टोळ्यांतील संघर्षामुळे पुण्यात पुन्हा गुन्हेगारीचे सावट गडद झालं आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, पोलिसांपुढे आता हे गँग नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं आव्हान आहे.