मुंबई प्रतिनिधी :
दि. १२ सप्टेंबर २०२५
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राऊत यांनी “नेपाळसारखा हिंसाचार भारतातही होऊ शकतो” असे विधान केल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 150 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. यावेळी खासदार मिलिंद देवरा, आमदार तुकाराम काते, माजी खासदार संजय निरुपम, सचिव संजय मोरे, उपनेत्या शीतल म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळाने राऊत यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन पोलिसांना सादर केले.
राऊत यांच्या विधानामुळे देशविरोधी वातावरण?
शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आरोप केला की, संजय राऊत वारंवार समाजात तेढ निर्माण करणारी आणि देशविरोधी वक्तव्य करत असतात. त्यांच्या विधानांमुळे देशातील शांतता धोक्यात येऊ शकते, असे म्हात्रे म्हणाल्या. “राऊत हे नेहमीच वादग्रस्त भाष्य करतात. त्यांनी नेपाळच्या हिंसक आंदोलनाचे समर्थन करत भारतातही तशाच प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते, असे सांगणे हे गंभीर असून यावर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.
देशद्रोहाचा आरोप?
म्हात्रे यांनी राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, “त्यांनी यापूर्वी पत्राचाळ घोटाळ्यात तुरुंगवास भोगला आहे. त्यांच्याकडून वारंवार समाजात अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न होतो आहे,” असा आरोप केला.
आता पुढे काय?
शिवसेनेच्या या मागणीनंतर पोलिस आयुक्त देवेन भारती यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राऊत यांच्यावर खरंच गुन्हा दाखल होतो का, की त्यांना फक्त समज देण्यात येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.