डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. १३ सप्टेंबर २०२५
आशिया कप २०२५मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा टी-२० सामना आता फक्त क्रीडाप्रेमीयांमध्येच नव्हे, तर देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या सामन्याविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. पहलगाम येथील नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारत-पाकिस्तान सामन्याचे आयोजन योग्य आहे का, हा सवाल आता न्यायालयाच्या दारात पोहोचला आहे.
१४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्याला विरोध करणारी ही याचिका उर्वशी जैन या विधी शाखेच्या विद्यार्थिनीने, आपल्या तीन सहकाऱ्यांसह दाखल केली आहे. यामध्ये स्पष्ट विचार मांडण्यात आला आहे की, राष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या देशाशी मैत्रीपूर्ण क्रिकेट सामने खेळणे हे नागरिकांच्या भावनांशी खेळ करण्यासारखे आहे. क्रिकेट कोणत्याही परिस्थितीत शहीदांच्या बलिदानापेक्षा मोठं ठरू शकत नाही, असं ठाम मत याचिकाकर्त्यांनी नोंदवलं आहे.
या याचिकेत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा 2005 चा उल्लेख करत, केंद्र सरकार आणि BCCI यांना या संदर्भात स्पष्ट धोरण मांडण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. “ऑपरेशन सिंदूर” नंतरही भारत-पाक सामना का आयोजित केला जात आहे, हा सवालही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.
या सर्व घडामोडींमुळे १४ सप्टेंबरचा सामना केवळ एक क्रिकेट मॅच न राहता, तो राजकीय, सामाजिक आणि राष्ट्रीय भावनांचा केंद्रबिंदू बनला आहे. कोर्ट या प्रकरणात सुनावणी करताना काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भारताने आपली स्पर्धा जोरदार सुरू केली असून, युएई संघाचा ९ गड्यांनी पराभव करत दमदार विजय मिळवला आहे. कुलदीप यादवच्या फिरकीसमोर आणि शिवम दुबेच्या अचूक माऱ्यामुळे युएईचा डाव केवळ ५७ धावांत आटोपला. भारताने हा लहान लक्ष्य सहज गाठून आपली तयारी मजबूत असल्याचं दाखवून दिलं आहे.
परंतु, आता प्रत्यक्ष सामना खेळला जाईल की नाही, हे सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसोबतच संपूर्ण देश याच निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहे.