डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. २२ सप्टेंबर २०२५
आशिया कप २०२५ मधील सुपर फोर फेरीत काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसऱ्यांदा सामना झाला. भारताने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत पाकिस्तानचा ६ गडी राखून सहज पराभव केला. मात्र, सलग दुसऱ्या पराभवानंतरही पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा आक्रमक वक्तव्य करत आपल्या संघाचेच कौतुक करताना दिसला.
“आम्ही अजून सर्वोत्तम खेळ दाखवलेला नाही!” – सलमानचा दावा
पराभव स्वीकारताना सलमान आगा म्हणाला, “भारतीय संघाने पॉवर प्लेमध्ये आमच्यावर दबाव टाकला. त्यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सामना आपल्या हातात घेतला. तरीसुद्धा आमची धावसंख्या वाईट नव्हती. आम्ही १७१ धावा केल्या आणि ती बचाव करण्यासाठी पुरेशी होती, असं मला वाटतं. रौफ आणि फहीमने चांगली गोलंदाजी केली.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “आम्ही अजून आमचा सर्वोत्तम खेळ दाखवलेला नाही. काही खेळाडूंची कामगिरी सकारात्मक होती. फखर आणि फरहानच्या फलंदाजीने आणि हॅरीच्या गोलंदाजीने दिलासा मिळाला. आता आमचं लक्ष श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यावर आहे.”
भारताची दमदार कामगिरी, अभिषेक-शुभमनची जोडी ठरली ‘गेमचेंजर’
भारताने पाकिस्तानने दिलेलं १७२ धावांचं लक्ष्य फक्त १९.१ षटकांत पूर्ण केलं. अभिषेक शर्मा (७४ धावा) आणि शुभमन गिल (४७ धावा) यांनी १०५ धावांची पहिली विकेट भागीदारी करून सामना हातात घेतला. तिलक वर्मानेही शेवटी नाबाद ३० धावांची भर घालून भारताला विजय मिळवून दिला.
पाकिस्तानी गोलंदाज अपयशी, भारताकडून पूर्ण वर्चस्व
पाकिस्तानच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजांच्या आक्रमणासोबत जुळवून घेता आलं नाही. सलमान आगा यालाही याची खंत वाटली. त्याने स्पष्ट सांगितलं, “जेव्हा आपल्या गोलंदाजांकडून धावा होत असतात, तेव्हा काही बदल आवश्यक असतो.”
भारताकडून विजयाची घोडदौड सुरूच
या विजयामुळे भारताने सुपर फोरमध्ये बळकट स्थिती मिळवली असून, पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. भारताने दोन्ही सामन्यांत पाकिस्तानचा सहज पराभव करत आशिया कपसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे.