ठाणे प्रतिनिधी :
दि. २३ सप्टेंबर २०२५
पडघा जि.ठाणे येथे दिनांक २०/०९/२५ रोजी विनापरवाना, अनुदानित कृषी युरियाचा काळाबाजार करून औद्योगिक वापरासाठी तस्करी करणाऱ्या एका गोडाऊनवर ,ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या गुण नियंत्रण शाखेने, विभागीय कृषी सहसंचालक श्री शिवाजी आमले ,अधीक्षक कृषी अधिकारी श्री बालाजी ताटे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रामेश्वर पाचे ,जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक श्री बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुकास्तरीय गुण नियंत्रण निरीक्षक श्री विवेक दोंदे यांनी पडघा येथील लॉजिस्टिक पार्क मध्ये पोलिसांच्या मदतीने छापा मारून दोन ट्रकसह एकूण १ कोटी, २८ लाख, ३१ हजार, ७३६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन ,पडघा ,ता. भिवंडी येथे संबंधितावर गुन्हा दाखल केला.
सविस्तर कारवाई अशी की ,पडघा पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार श्री दादासो एडके यांना मुंबई नाशिक हायवेवर अशोक लेलँड ट्रक मध्ये युरिया सदृश खत असून काळयाबाजारात विक्री करिता घेऊन जात असल्याचा संशय आल्याने,त्यांनी लगेच कृषी विभागाच्या गुण नियंत्रण निरीक्षक श्री विवेक दोंदे यांना फोन द्वारे संपर्क केला. त्यानुसार श्री. विवेक दोंदे यांनी तात्काळ सदर घटनास्थळी पोहोचून युरिया खताची खात्री केली आणि संबंधित ट्रकचालकाची चौकशी केली असता त्यांच्याकडे सदर संशयित टेक्निकल ग्रेड युरियाची बिले मागितली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. हे खत कोठून भरले असे विचारले असता लॉजिस्टिक पार्क मधील गोडाऊन मधून भरले असल्याचे सांगितले. सदर दोन संशयित, टेक्निकल ग्रेड खतांनी भरलेल्या अशोक लेलँड ट्रकसह सदर गोडाऊन स्थळी, एकूण नऊ कामगार, अनुदानित कृषी युरियाच्या बॅगा मधील युरिया खत , औद्योगिक वापरासाठीच्या टेक्निकल ग्रेड युरिया खताच्या गोण्यामध्ये भरून री पॅकिंग करण्याचे काम करत असल्याचे आढळून आले. सदर गोडाऊन ठिकाणी कोणत्याही प्रकारचा परवाना आढळून न आल्याने ,संपूर्ण गोडाऊन ची तपासणी पंचांसमक्ष केली असता सफेद रंगाचे औद्योगिक वापरासाठीचे प्लास्टिक गोणीतील युरिया खताच्या १२१७ गोणी, पिवळ्या रंगाच्या शेती उपयोगी वापराच्या युरिया खताच्या ५१ गोणी, औद्योगिक वापरासाठीचे प्लास्टिक गोणीतील संशयित युरिया खताच्या १४०० गोणी २ ट्रक मध्ये मिळून आल्या. युरिया खताच्या पिवळ्या व सफेद रंगाच्या रिकाम्या गोण्या, गोणी शिलाई मशीन, नायलॉन दोरी बंडल व इतर साहित्य मिळाले.
वरील साहित्य व 2 अशोक लेलँड रिकाम्या वाहनांची किमतीसह एकूण १ कोटी २८ लाख ३१ हजार ७३६ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
वरील सर्व प्रकार हा कृषी अनुदानित युरिया खता ची तस्करी करून औद्योगिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या टेक्निकल ग्रेड युरिया च्या नावाने काळाबाजार करून जादा नफा कमविण्याच्या उद्देशाने संगनमताने करून, शासनाची फसवणूक केल्याच्या कारणावरून सर्व एकूण १६ आरोपींविरोधात
1) खत नियंत्रण आदेश 1985
2) खत वाहतूक नियंत्रण आदेश 1973
3) जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955
4) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार दिनांक २१/०९/२५ रोजी कृषी विभागामार्फत गुन्हा नोंदवण्यात आला असून संपूर्ण खत साठ्यासह सर्व मुद्देमाल जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिला. पुढील तपास पोलिस करत आहेत.