नवी दिल्ली प्रतिनिधी
दि. २३ सप्टेंबर २०२५
देशात जीएसटी सुधारणा लागू होताच तब्बल ३७५ वस्तू स्वस्त झाल्या आहेत. नवीन सुधारित प्रणालीनुसार, जीएसटीचे स्लॅब फक्त ५ टक्के आणि १८ टक्क्यांवर मर्यादित करण्यात आले आहेत. त्यामुळे घरेलू वापराच्या अनेक वस्तूंवर कराचा बोजा कमी झाला असून, ग्राहकांना थेट फायदा मिळणार आहे.
स्वयंपाकघरातील वस्तूंचे दर घसरले
दूध, लोणी, बिस्किटे, सुकामेवा, तूप, कॉर्नफ्लेक्स, फळांचे रस, नारळपाणी, आईस्क्रीम, जाम-जेली, चीज, स्नॅक्स, सॉसेज, मीट आणि पाणीच्या २० लिटरच्या जारसारख्या खाद्य व पेय पदार्थांवरील दर कमी झाले आहेत.
वैयक्तिक वापराच्या वस्तूंनाही दिलासा
शेविंग क्रीम, आफ्टरशेव लोशन, टॅल्कम पावडर, फेस क्रीम, टूथब्रश, टॉयलेट साबण, शाम्पू आणि केसांच्या तेलावरही कर कमी करण्यात आला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणांमध्ये कपात
टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी, डिशवॉशर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे दरही कमी झाले असून ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
औषधांवरील कर कमी
औषधं, डायग्नोस्टिक किट, ग्लूकोमीटर यांसारख्या वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी आता ५% करण्यात आला आहे. सरकारने औषध दुकानदारांना यानुसार एमआरपीमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.
सेवा क्षेत्रातील सूट
सौंदर्यसंपादन केंद्रे, फिटनेस क्लब, योगा क्लासेस आणि हेल्थ क्लब यांवरील सेवांवरही कर कपात करण्यात आली असून, याचा फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे.
या व्यापक जीएसटी सुधारणा नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर सकारात्मक परिणाम करणार असून मुदत खर्च कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे.