मुंबई प्रतिनिधी :
दि. २५ सप्टेंबर २०२५
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करताना काही धक्कादायक बदल केले असून, काही खेळाडूंना वगळण्याचा तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ही मालिका २ ऑक्टोबरपासून सुरू होत असून पहिली कसोटी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर, तर दुसरी कसोटी १० ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे.
या मालिकेसाठी शुभमन गिलकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली असून रवींद्र जडेजाला उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. मात्र, संघ निवडीसह काही मोठे नावं वगळण्यात आली असून त्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ उडवली आहे. सर्वात मोठा धक्का म्हणजे अनुभवी करुण नायरला वगळण्यात आले असून त्याच्या जागी देवदत्त पडिक्कलला संधी देण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे नायरचा पत्ता कट करण्यात आला आहे — चार कसोटी सामन्यांत केवळ एक अर्धशतक झळकावणे त्याला महागात पडले.
दुसरीकडे, ऋषभ पंत अजूनही पूर्णतः तंदुरुस्त नसल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षणाची जबाबदारी नारायण जगदीसनकडे सोपवण्यात आली आहे. पंतला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान झालेली पायाची दुखापत अद्याप पुरेशी बरी न झाल्याने त्याला या मालिकेसाठी बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याऐवजी BCCI ने विश्वास दाखवलेला नारायण जगदीसन आता संघात अधिकृतपणे समाविष्ट झाला आहे.
याशिवाय, अष्टपैलू अक्षर पटेलने कसोटी संघात पुनरागमन केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर देवदत्त पडिक्कलची निवड झालेली असून, तो संघात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, अशी अपेक्षा आहे.
या संघरचनेवरून BCCI ने आगामी भविष्यासाठी संघाचा पाया मजबूत करण्यासाठी तरुण आणि उत्साही खेळाडूंना संधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे, हे स्पष्ट होते. आगामी कसोटी मालिकेतील या नव्या संधी आणि जबाबदाऱ्या संघाला कशा प्रकारे यश मिळवून देतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.