डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. २५ सप्टेंबर २०२५
मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी व अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं पाण्याखाली गेली असून, अनेकांची शेती, जनावरे, घरं यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कर्जबाजारीपणाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये बँकांकडून कर्जवसुली तात्काळ थांबवण्यात येणार आहे, अशी घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, लातूर, जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाने विक्रमी हजेरी लावली आहे. मराठवाड्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या १२४ टक्के पाऊस पडला आहे. २२ सप्टेंबरपर्यंत सरासरी ६०४ मिमी पाऊस होत असतो. मात्र आता ७४७ मिमी इतका सरासरी पाऊस मराठवाड्यात झाला आहे. फक्त सप्टेंबरचा विचार करायचा १६५ टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे. त्यानंतर आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर, काही बँका थकबाकीदार शेतकऱ्यांवर वसुलीचा तगादा लावत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत होत्या. यावर प्रतिक्रिया देताना कृषिमंत्री भरणे म्हणाले, “ज्या भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालं आहे, तिथे कर्जवसुली तत्काळ थांबवली पाहिजे. यासंदर्भात राज्य सरकार लवकरच बँकांना अधिकृत सूचना देणार आहे.”
शेतकऱ्यांचं सर्वस्व या नैसर्गिक आपत्तीने हिरावून नेलं असताना, सरकारने उचललेलं हे पाऊल त्यांच्या मानसिक आणि आर्थिक आधारासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कर्जवसुली थांबवण्याचा हा निर्णय शेतकऱ्यांना सावरायला थोडीफार मदत करणारा ठरणार आहे.