पुणे प्रतिनिधी :
दि. ०४ ऑक्टोबर २०२५
लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलच्या गाडीने वडगाव पुलाजवळ रिक्षाला दिलेल्या धडकेच्या प्रकरणावरून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी पाटील यांची भेट घेतल्यानंतर, त्यांनी थेट पोलिस उपायुक्त संभाजी पाटील यांना फोन करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
ही घटना ३० सप्टेंबर रोजी घडली असून, गौतमी पाटीलच्या गाडीने एक रिक्षा जोरात धडक दिली. यात रिक्षाचालक मरगळे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पीडिताचे नातेवाईक चंद्रकांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात उपस्थित राहिले आणि त्यांनी न्याय आणि मदतीची मागणी केली.
या दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी संतप्त होत डीसीपी संभाजी पाटील यांच्याशी फोनवर सविस्तर संवाद साधत प्रश्न उपस्थित केले की, “गौतमी पाटीलला अटक करायची की नाही? गाडी तिचीच आहे ना? तुम्ही म्हणता ती गाडीत नव्हती, पण कोणीतरी चालवत होतंच ना? की गाडी भूत चालवत होतं?”
तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले की, “गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला अटक झाली का? त्याच्यावर गुन्हा दाखल झाला का? गाडी कोठे आहे? ती जप्त केली आहे का? गौतमी पाटीलला गाडीची मालकीण म्हणून नोटीस दिली का?”
चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, “रुग्णालयात असलेल्या रिक्षाचालकाचा खर्च तरी तिच्याकडून वसूल करावा. ती गौतमी पाटील असली, तरी जबाबदारी स्वीकारावी लागेल. पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं.”
या प्रकारामुळे पोलिसांवरील दबाव वाढला असून, प्रकरणात लवकरच ठोस कारवाई होण्याची शक्यता आहे.