मुंबई प्रतिनिधी :
दि. ०७ ऑक्टोबर २०२५
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या आगामी मराठी चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला आहे. ‘मना’चे श्लोक या चित्रपटाच्या नावावर श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, नाव न बदलल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सेवा मंडळाचं म्हणणं आहे की, “‘मना’चे श्लोक” हे शीर्षक समर्थ रामदास स्वामींच्या पवित्र ग्रंथाशी संबंधित असल्याने, त्याचा वापर एका काल्पनिक व मनोरंजनात्मक चित्रपटासाठी करणे हे धार्मिक भावना दुखावणारे आहे. त्यांच्या मते, पवित्र ग्रंथांशी निगडित शब्दांचा वापर सांस्कृतिक संवेदनशीलता लक्षात घेऊनच केला पाहिजे.
चित्रपटाच्या टीमकडून अद्याप या वादावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र सेवा मंडळाने स्पष्टपणे सांगितले आहे की, जर लवकरच चित्रपटाचं नाव बदलण्यात आलं नाही, तर संघटनेच्या वतीने आंदोलन छेडलं जाईल.
दरम्यान, ‘मना’चे श्लोक हा सिनेमा कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित असून, त्यात मृण्मयी देशपांडेसोबत राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
चित्रपटाविषयी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाली, “ही कथा मनवा आणि श्लोक या दोन पात्रांभोवती फिरते. त्यांचं नातं, विचार आणि संवाद हे प्रेक्षकांना आपलेसे वाटतील. ही गोष्ट प्रत्येकाच्या मनातल्या विचारांशी नातं सांगणारी आहे.”
चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून, त्यानंतरच या शीर्षकावर वाद उफाळून आला आहे. आता निर्माते आणि कलाकार या वादाला कशी प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.