मुंबई प्रतिनिधी :
दि. ०८ ऑक्टोबर २०२५
राज्यात अलीकडेच झालेल्या जोरदार पावसामुळे मच्छीमार समुदायावर मोठे संकट ओढावले. त्यांच्या बोटी, जाळी आणि इतर साधनसामग्रीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर ७ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, मच्छीमार बांधवांच्या नुकसानीसाठी १०० कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अन्य मंत्री यावेळी उपस्थित होते.
नीतेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार
मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे ट्विटद्वारे आभार मानले. नुकताच त्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला मदतीसाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश दिले होते. तसेच मुख्यमंत्री आणि सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. याची दखल घेत हे पॅकेज जाहीर करण्यात आले.
पूरग्रस्तांना १०० टक्के मदतीचे उद्दिष्ट
महायुती सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत सर्व पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यावर भर देण्यात आला. कोणताही पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहू नये, याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. शासकीय यंत्रणेवर पालकमंत्र्यांनी लक्ष ठेवावे, अशी सूचना यावेळी देण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांमार्फत पत्रकार परिषद घेऊन या निर्णयांची माहिती दिली जाणार आहे.
सरकारचा निर्णय मच्छीमारांसाठी दिलासादायक
मच्छीमारांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून, तात्काळ मदतीची गरज अधोरेखित केल्यानंतर अखेर सरकारने मोठा निर्णय घेत १०० कोटींचे मदतपॅकेज जाहीर केले आहे. या निर्णयामुळे मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.