पुणे प्रतिनिधी :
दि. १० ऑक्टोबर २०२५
बोगस कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवल्याच्या आरोपानंतर निलेश घायवळ अडचणीत सापडला असतानाच, त्याच्या भावाला शस्त्र परवाना नाकारल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस करूनही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सचिन घायवळ याला परवाना नाकारल्याचं समोर आलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, “निलेश घायवळ प्रकरणात मी स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी बोललो. मी त्यांना स्पष्ट सांगितलं – कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो, कायदा मोडला तर त्याच्यावर नक्कीच कारवाई व्हायला हवी. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळसाठी शिफारस केली होती, पण तरीही पोलीस आयुक्तांनी परवाना दिला नाही, असं त्यांनी मला सांगितलं.”
ते पुढे म्हणाले, “पुणे असो वा राज्यातील कुठलाही भाग, कायदा-सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यात कुणाचाही हस्तक्षेप मी सहन करणार नाही.”
याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी तिघंही एकत्र बसलो होतो. तेव्हाही निलेश घायवळ प्रकरणावर चर्चा झाली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनीदेखील सांगितलं की, या विषयात कुणाचंही म्हणणं ऐकायचं नाही – कायद्यानुसारच कारवाई व्हायला हवी. ज्यांनी नियम तोडले आहेत, त्यांच्यावर रीतसर पावलं उचललीच पाहिजेत,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
त्यामुळे सरकारची भूमिका स्पष्ट झाली आहे – कायद्याच्या चौकटीबाहेर जाणाऱ्यांना कोणतीही सूट नाही!