पुणे प्रतिनिधी :
दि. १० ऑक्टोबर २०२५
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच राजकीय घराण्यांच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता थेट काँग्रेसच्या गोटात फटाका फोडला आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुजाता शेट्टी, त्यांचे पती माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी, आणि पुत्र साक्षात शेट्टी हे तिघेही आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असून, खडकवासला विधानसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात शेट्टी कुटुंब राष्ट्रवादीत दाखल होणार आहे. शेट्टी परिवाराचे पुण्यातील कॅन्टोन्मेंट मतदारसंघात मोठं राजकीय वजन असल्याने हा प्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का ठरत आहे.
२०१७ मध्ये झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत सुजाता शेट्टी काँग्रेसतर्फे विजयी झाल्या होत्या, तर अवघ्या दहा महिन्यांपूर्वी त्यांच्या पती सदानंद शेट्टी यांना काँग्रेसने प्रदेश सरचिटणीसपद दिलं होतं. पण अजित पवारांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबाला आपल्या गोटात ओढून काँग्रेसला अनपेक्षित झटका दिला आहे.
गेल्या आठवड्यातच अजित पवारांनी काँग्रेसचे युवा नेते रोहन सुरवसे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत पहिला मोठा फटका दिला होता. आता शेट्टी कुटुंबाचं आगमन म्हणजे पुण्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक शक्तीवर अजित पवारांचा दुसरा वार मानला जात आहे.
२०१७ पर्यंत पुण्यात राष्ट्रवादीचं एकछत्री राज्य होतं. त्यानंतर पक्षात फूट पडल्याने शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी आपापले बालेकिल्ले मजबूत करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने २०१७ मध्ये राष्ट्रवादीचा गड असलेल्या पुण्यात वर्चस्व मिळवलं होतं. पण आता अजित पवार पुन्हा एकदा महापालिकेत आपली पकड मजबूत करण्यासाठी वेगाने हालचाली करत आहेत.
आजचा पक्षप्रवेश सोहळा त्या प्रयत्नांचाच पुढचा टप्पा ठरत असून, पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा ‘पुर्नबांधणी मोर्चा’ जोर धरू लागला आहे.