मुंबई प्रतिनिधीः
सलमान खान याचा राधे नावाचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॅार्मवर प्रदर्शित होत आहे. त्यामूळे थिएटर मध्ये प्रेक्षकांना खेचणारा चित्रपट जर ओटीटी प्लॅटफॅार्मवर सक्सेस झाला तर येथून पुढे अनेक जण हा प्रयोग करतील. त्यामूळे थिएटर मध्ये येणारा प्रेक्षक घरी चित्रपट पाहिल. परिणामी थिएटर्स बंद होतील या भितीने थिएटर चालक नाराज झाल्याचे समजते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजेच गेल्या मार्च मध्ये बंद थिएटर बंद करण्यात आली होती. त्यानंतर अनलॅाक प्रक्रियेमध्ये मल्टिफ्लेक्स व नाट्यगृहांना ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती या नियमाच्या आधारे सुरु करण्याची परवानगी दिली होती. तेंव्हा कुठे तरी अर्थचक्र पुन्हा सुरु झाल्याचे दिसत होते. मात्र, कोरोनाच्या दुस-या लाटेने पुन्हा थिएटर बंद करण्याचा आदेश निघाला. परिणामी, करोडो रुपये गुंतवणूक केलेल्या निर्मात्यांसाठी हा मोठा धक्का होता. मात्र, गेलेला पैसा परत कमविण्यासाठी कोणते का माध्यम असेना त्याद्वारे पैसा वसूल करणे हे निर्मात्यांचे लक्ष आहे. त्यामूळे त्यांनी ओटीटी या ऑनलाईन प्लॅटफॅार्मवर सलमान खानचा राधे हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
बहुचर्चित राधे-युवर मोस्ट वॅाण्टेड भाई हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा निर्मात्यांचा कयास आहे. हा चित्रपट जर ओटीटी प्लॅटफॅार्मवर यशस्वी झाला तर वितरक, थिएटर चालक, मल्टिफ्लेक्सवाले अडचणीत येतील हे मात्र नक्की. कारण, प्रेक्षक घरबसल्या नव्या चित्रपटांचा आनंद घेईल मग, थिएटर मध्ये कोण येईल हा खरा प्रश्न थिएटर मालकांसमोर आ वासून उभा राहिला आहे.