मुंबई प्रतिनिधी :
दि. १७ ऑक्टोबर २०२५
सोशल मीडियावर सध्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सहभागी झालेल्या १० वर्षीय इशित भट्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. गुजरातमधील गांधीनगरचा राहणारा हा मुलगा शोमध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी केलेल्या वर्तनामुळे नेटिझन्सच्या निशाण्यावर आला आहे. अनेकांनी त्याला ‘उद्धट’ म्हटलं असून, त्याच्या पालकांच्या संस्कारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. काहींचे म्हणणे आहे की, प्रसिद्धीसाठी आणि टीआरपी वाढवण्यासाठी या व्हिडिओचा हेतुपुरस्सर प्रसार केला गेला.
या पार्श्वभूमीवर मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी फेसबुकवर लांबलचक पोस्ट टाकत आपलं मत मांडलं आहे.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमुळे ओळख मिळवणाऱ्या स्वप्नील यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लहान मुलांना शोची क्रिएटिव्ह टीम आधीच मार्गदर्शन करते. त्यांना थोड्या आगाऊपणे बच्चनसाहेबांशी संवाद साधायला सांगितलं जातं, ज्यामुळे कार्यक्रमात विनोद आणि हलकंफुलकं वातावरण तयार होतं. पूर्वीच्या अनेक भागांमध्येही असं घडलं आहे. मात्र इशित भट्टच्या बाबतीत ही आगाऊपणाची रेष ओलांडली गेली.”
इशितविषयी बोलताना स्वप्नील म्हणतात, “या मुलाला सुरुवातीला त्याच्या ओव्हरस्मार्टपणासाठी प्रोत्साहन मिळालं असावं, पण पुढे तो वाहवत गेला. पहिल्या काही प्रश्नांची सहज उत्तरे दिल्यानंतर त्याचा आत्मविश्वास उर्मटपणात बदलला. त्याच्या वर्तनामागे ADHD असल्याचं म्हटलं जातं, पण मला वाटतं त्याला आणखी एक ‘सिंड्रोम’ आहे — ‘शिनचॅन सिंड्रोम’.”
त्यांनी पुढे स्पष्ट केलं, “‘सवाल तो पुछो’, ‘ऑप्शन तो बताओ’ — हा त्याचा जो सूर आहे, तो अगदी त्या कार्टून पात्र शिनचॅनसारखाच वाटतो. अशा प्रकारच्या कार्टूनकडे पाहत मोठी झालेली मुलं त्याच लहेज्यात बोलू लागतात. त्यामागे पालकांचं दुर्लक्ष, अति लाड आणि स्क्रीनवरील प्रभाव सगळं काही कारणीभूत असतं. थोडक्यात सांगायचं तर आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला आणि वर वृश्चिक दंश झाला — असं त्याचं झालंय.”
इशितच्या व्हिडिओबद्दल त्यांनी पुढे लिहिलं, “व्हायरल झालेला पहिला एडिटेड व्हिडिओ पाहून लोकांचा संताप उसळला, पण जेव्हा संपूर्ण एपिसोड पाहिला, तेव्हा तो मुलगा तितका वाईट वाटत नाही. तरीही SonyLIV ने त्याचा भाग काढून टाकला आणि थंबनेल मात्र त्याचंच ठेवलं — हीच तर गंमत.”
शेवटी स्वप्नील म्हणाले, “आता देशाने या मुलाला सोडून द्यावं. त्याच्यावर झालेली हेटाळणी पुरेशी झाली. अनेक राजकारणी याहून जास्त उर्मट असतात, पण त्यांच्यावर एवढं कोणी बोलत नाही. हा तर अजून लहान मुलगा आहे.”
स्वप्नील यांच्या या पोस्टवर नेटिझन्सकडून मिश्र प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी त्यांच्या संतुलित भूमिकेचे कौतुक केले आहे.