पुणे प्रतिनिधी :
दि. १७ ऑक्टोबर २०२५
हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची औपचारिक घोषणा आज पुण्यातील पत्रकार भवन, नवी पेठ येथे करण्यात आली. या प्रसंगी चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक आशिष कैलास जैन आणि प्रमुख भूमिकेत असलेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती ताई देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
“स्त्री Talks” हा पूर्णपणे महिलांवर आधारित चित्रपट असून यात एकही पुरुष पात्र नाही. वेगवेगळ्या स्वभावाच्या ११-१२ महिला स्वतःला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी एकत्र येतात, आणि या प्रवासात त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या भावनिक, सामाजिक आणि मानसिक घडामोडींवर हा चित्रपट प्रकाश टाकतो.
या चित्रपटात मासिक पाळी या विषयाला धर्म, देव आणि परंपरांशी विनाकारण जोडल्या जाणाऱ्या दृष्टिकोनावर गंभीर पण वास्तववादी भाष्य करण्यात आले आहे. तसेच drug addiction, स्त्री स्वातंत्र्य, आणि अंतर्गत संघर्ष या काही ठळक आणि बोल्ड विषयांनाही या चित्रपटात स्पर्श करण्यात आला आहे.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती ताई देसाई या या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, त्यांची ही भूमिका महिलांच्या सशक्ततेचा आणि स्वाभिमानाचा नवा अध्याय उघडणार आहे.
चित्रपटाचे निर्माते नवीन पवार, कार्यकारी निर्माती रोहिणी मानकर, तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन आशिष कैलास जैन यांचे आहे.
“स्त्री Talks” हा चित्रपट हिंदी भाषेत असून, येत्या महिला दिनी – ८ मार्च २०२६ रोजी देशभर प्रदर्शित होणार आहे.
—
स्त्री Talks टीम