डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. २६ नोव्हेंबर २०२५
अयोध्येतील राम मंदिरावर २५ नोव्हेंबर रोजी धर्मध्वजा फडकवल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात नवा सूर लावला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनात भारतात इस्लामविरोधी भावना वाढत आहेत असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच काही ऐतिहासिक स्थळांचा अनादर होत असल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत राममंदिराचे बांधकाम झाले असून, २२ जानेवारी २०२४ रोजी मंदिरात रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली होती.
हिंदुत्वाचा दबाव आणि अल्पसंख्याक प्रश्न
राम मंदिरातील ध्वजारोहण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी, RSS प्रमुख मोहन भागवत, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाचे फोटो पंतप्रधानांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया देत भारतावर अल्पसंख्याकांबद्दल भेदभाव केल्याचा आरोप केला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की,
“ही घटना भारतातील मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवर वाढणाऱ्या दडपणाचे प्रतीक आहे आणि हिंदुत्वावर आधारित विचारसरणीच्या प्रभावामुळे त्यांचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा धोक्यात आला आहे.”
भारतावर इस्लामोफोबियाचा आरोप, UN कडे तक्रार
पाकिस्तानच्या निवेदनात आणखी आरोप करण्यात आला की, काही प्राचीन मशिदींचे अस्तित्व धोक्यात आले असून त्यांचा अवमान होत आहे. तसेच भारतातील मुस्लिमांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात बाजूला सारले जात असल्याचेही पाकिस्तानचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय समाज यांना भारतातील इस्लामोफोबिया, द्वेषपूर्ण भाषण आणि मुस्लिमांवरील हल्ले याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
भारताला पाकिस्तानची विनंती
निवेदनाच्या शेवटी पाकिस्तानने भारत सरकारला आवाहन करत म्हटले आहे की, भारताने आपल्या मुस्लिम नागरिकांसह सर्व धार्मिक समुदायांच्या सुरक्षेची खात्री करावी आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार नियमांनुसार त्यांच्या उपासनेच्या ठिकाणांचे रक्षण करावे.







