पुणे प्रतिनिधी :
दि. ०८ डिसेंबर २०२५
शरद पवार यांच्या गटातील एका महत्त्वाच्या नेत्याच्या भाजप प्रवेशामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची माहिती समोर येत आहे. यात केंद्रातील एक मंत्री आणि भाजपचा एक आमदार आमनेसामने आल्याचं सांगितलं जात आहे. सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांमध्ये ये-जा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
महाराष्ट्रात महायुती सत्तेत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नेते-सहकार्यांचा ओढा भाजपकडे दिसतो आहे. मात्र, पुण्यातील एका प्रवेशामुळे पक्षातच तणाव वाढल्याचं कळतं. वारजेचे माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्या भाजप प्रवेशावरुन पुणे भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चांगलाच बाचाबाचीचा सूर लागल्याची चर्चा आहे. बैठकीत खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्यात तीव्र वाद झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
सचिन दोडके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. त्यांचा भाजप प्रवेश हा प्रत्यक्षात वादाची मुख्य ठिणगी ठरल्याचं मानलं जातं. भीमराव तापकीर यांनी दोडके यांच्या प्रवेशाला विरोध दर्शवल्याचं समजतं. त्यामागचं कारणही स्पष्ट आहे — दोडके यांनी खडकवासला मतदारसंघातून दोनदा भीमराव तापकीर यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.
खडकवासला हा तापकीर यांचा मजबूत बालेकिल्ला असून, ते सलग चार कार्यकाळ आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीतही त्यांनी दोडके यांचा पराभव केला होता. त्यामुळेच भविष्यात दोडके हेच भाजपकडून खडकवासल्यात पर्याय म्हणून पुढे येऊ शकतात, अशी भीती तापकीर गटात निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.







