मुंबई प्रतिनिधी :
०९ डिसेंबर २०२५
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘धुरंधर’ चित्रपटाची सर्वाधिक चर्चा सध्या एका नावाभोवती फिरतेय—अक्षय खन्ना. ‘रेहमान डकैत’ या कुख्यात पण करिष्माई खलनायकाच्या भूमिकेत त्याने अक्षरशः कहर केला असून प्रेक्षक, समीक्षक आणि इंडस्ट्री सर्वांनीच त्याच्या अभिनयावर ठसा उमटवला आहे.
रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि सारा अर्जुन यांसारख्या मोठ्या कलाकारांच्या मेळाव्यातही अक्षय खन्नाने केलेली दमदार कामगिरी प्रेक्षकांच्या डोळ्यात भरतेय. ‘छावा’नंतर पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत त्याने दाखवलेली भेदक सादरीकरणाची ताकद सर्वांनाच पटली आहे. सोशल मीडियावर तर अक्षयच्या एंट्री सीनचे व्हिडिओ, त्यावरचं गाणं आणि त्याचे डायलॉग्स तुफान व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान हिचाही या चर्चेत अधिकृत प्रवेश झाला आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत अक्षय खन्नाच्या ‘रेहमान डकैत’ अवताराचं भरभरून कौतुक केलं आहे. एवढंच नव्हे, तर “अक्षय खन्नाला या भूमिकेसाठी ऑस्कर मिळालं पाहिजे!” अशी थेट आणि मोठी मागणी तिने केली आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाचेही तिने विशेष अभिनंदन केले.
चित्रपटातील अक्षयची धमाकेदार एंट्री, आक्रमक अंदाज आणि स्क्रीनवरची प्रचंड पकड यामुळे “व्हिलन हिरोपेक्षा भारी पडतो” याचं उत्तम उदाहरण ‘धुरंधर’मध्ये पाहायला मिळतं आहे.
दुसरा भाग कधी?
प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवणारी बातमी म्हणजे ‘धुरंधर’चा सिक्वेलही जाहीर झाला आहे. चित्रपटाच्या शेवटीच दुसऱ्या भागाची झलक देण्यात आली असून १९ मार्च २०२६ रोजी ‘धुरंधर 2’ थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अक्षय खन्नाच्या करिष्माई “खलनायकी”नं गाजलेल्या पहिल्या भागानंतर आता दुसऱ्या भागाची सर्वत्र आतुरतेने वाट पाहिली जात आहे.







