पुणे प्रतिनिधी :
दि. ०९ डिसेंबर २०२५
असंघटित कामगारांचे हक्क, सामाजिक न्याय आणि शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांची निष्ठेने जपणूक करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव आता आपल्यात नाहीत. सोमवारी रात्री त्यांचे पुण्यात निधन झाले. आज, मंगळवारी संध्याकाळी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.
बाबा आढाव यांना गेल्या बारा दिवसांपासून पुणे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सुरुवातीला प्रकृती सुधारत असतानाच अचानक किडनी निकामी झाली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी ८.२५ वाजता हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं समाजवादी आणि कामगार चळवळींमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा, कामगार हक्क आणि समतेसाठी त्यांचे आयुष्यभराचे योगदान अपूर्व राहिले आहे.
अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी अपेक्षित
बाबा आढाव यांचे पार्थिव आज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पुणे मार्केट यार्ड येथील हमाल भवनात अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. असंख्य कामगार, समाजकार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे.
संध्याकाळी साडेपाच वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या मागे पत्नी शिलाताई, मुलं असीम आणि अंबर, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
समाजवादी आंदोलनाचा दृढ चेहरा
१ जून १९३० रोजी पुण्यात जन्मलेले बाबासाहेब पांडुरंग आढाव हे असंघटित कामगार चळवळीचे अग्रणी म्हणून संपूर्ण देशभर प्रसिद्ध होते. हमाल, रिक्षाचालक, हातगाडी कामगार आणि शेकडो असंघटित कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.
त्यांच्या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या ‘हमाल पंचायत’, ‘असंघटित कामगार कर्मचारी महासंघ’ या संस्था त्यांनी उभ्या केल्या. सामाजिक ऐक्य आणि जातीय भेद मिटवण्यासाठी त्यांनी चालवलेली ‘एक गाव – एक पाणवठा’ ही चळवळ राज्यभर गाजली.
पुण्यातील सामाजिक प्रश्नांवर सदैव पुढाकार घेतल्यामुळे त्यांना शहरात आदराने ‘पुणे शहराचे कुटुंब प्रमुख’ अशीही ओळख मिळाली. त्यांनी सामाजिक प्रश्नांवर अनेक लेख व पुस्तकेही लिहिली असून त्यांच्या साहित्यिक योगदानाचेही स्वतंत्र महत्त्व आहे.







