नागपूर प्रतिनिधी :
दि. ०९ डिसेंबर २०२५
नागपूरमध्ये नोकरीच्या आमिषाने लग्न करून फसवणूक झाल्याच्या मन हेलावणाऱ्या प्रसंगाने खळबळ माजली आहे. सावनेर तालुक्यातील माळेगाव टाउन येथील महिला कबड्डीपटू किरण दाढे (वय २७) यांनी मानसिक ताण आणि त्रासाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
किरण यांनी २०२० मध्ये स्वप्नील जयदेव लांबघरे याच्याशी विवाह केला होता. लग्नापूर्वी किरण आणि तिच्या भावाला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल या अपेक्षेने किरणने विवाहाला होकार दिला. परंतु काही काळानंतर नोकरीचे आश्वासन फसवे असल्याचे उघड झाले.
दरम्यान, लग्नानंतर पतीकडून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोपही पुढे आला आहे. वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे व अत्याचारामुळे किरण माहेरी राहायला गेली होती. त्यानंतरही तिला धमक्या दिल्या जात असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. शिवाय, स्वप्नीलने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला होता.
या सर्व ताणतणावातून किरण नैराश्यात गेली. अखेर तिने कीटकनाशक प्राशन करून जीवन संपवले. तत्काळ रुग्णालयात दाखल केल्यानंतरही तिचा मृत्यू झाला.
किरणच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून तिच्या कुटुंबीयांनी स्वप्नीलवर फसवणूक, मानसिक छळ व नोकरीच्या खोट्या आमिषाचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.







