धाराशीव प्रतिनिधी :
दि. ०९ डिसेंबर २०२५
धाराशीव जिल्ह्यातील चोराखळी परिसरात कलाकेंद्रातील नर्तकीशी असलेल्या प्रेमसंबंधांमुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. अश्रूबा कांबळे (वय २५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अश्रूबा हा धाराशीवमधील साई लोकनाट्य कला केंद्रात काम करीत होता. त्याच केंद्रातील एका नर्तकीशी त्याचे सुमारे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. अश्रूबा विवाहित असतानाही हे संबंध सुरू होते. दोघेही अनेकदा बाहेर फिरायला जात असत, तसेच ८ डिसेंबर रोजी ते शिंगणापूर देवदर्शनासाठी गेले होते.
देवदर्शन आटोपून परत येत असताना अश्रूबाला पत्नीचा फोन आला. हा कॉल कोणाचा होता, यावरून नर्तकीने त्याला प्रश्न विचारत वाद घातला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात अश्रूबाने “मी आत्महत्या करीन” अशी धमकी दिली होती, परंतु नर्तकीने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. थोड्याच वेळात अश्रूबाने प्रत्यक्षात गळफास घेऊन जीवन संपवले.
या घटनेनंतर पोलीसांनी नर्तकीला ताब्यात घेतले असून तिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अनैतिक संबंध आणि वैवाहिक ताणतणावाच्या गुंत्यात अडकलेल्या तरुणाने अशा प्रकारे टोकाचा मार्ग अवलंबल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.






