बीड प्रतिनिधी :
दि. १० डिसेंबर २०२५
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दोन महिन्यांचा ठोस अल्टिमेटम दिला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांना सहआरोपी न ठरवल्यास राज्यभर तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या मुद्द्यावरून जरांगे आणि मुंडे यांच्यात खडाजंगी झाल्याचे समजते. धनंजय मुंडेंनी “प्रकरणाची चौकशी एसआयटी करत आहे” असे सांगत स्वतःवरील आरोप फेटाळून लावले. मात्र, “एसआयटी नेमकी कधी स्थापन झाली?” असा थेट प्रश्न जरांगे यांनी विचारत मुंडेंच्या विधानावर शंका उपस्थित केली.
नागपूर अधिवेशनाच्या काळात मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाही उपस्थित होत्या. ही बैठक केवळ विकासकामांसाठी असल्याचा दावा मुंडेंनी केला असला, तरी “पोलीस महासंचालकांची उपस्थिती नेमकी कशासाठी?” असा संशय व्यक्त करत जरांगे यांनी या भेटीवरच प्रश्नचिन्ह उभे केले.
तसेच, फडणवीस आणि पवार यांनी “या पापात सहभागी होऊ नये” अशी तीव्र टीकाही जरांगे पाटील यांनी केली आहे.







