मुंबई प्रतिनिधी
दि. १३ डिसेंबर २०२५
मनोरंजनसृष्टीत यशासोबतच चढ-उतार हे अटळ असतात. एके काळी प्रचंड लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले अनेक कलाकार आज प्रकाशझोतातून दूर गेलेले दिसतात. स्टँड-अप कॉमेडीच्या दुनियेत मोठं नाव असलेले सुनील पाल यांच्याबाबतही सध्या असंच चित्र पाहायला मिळत आहे.
कधी काळी आपल्या वेगळ्या शैलीमुळे आणि विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणारे सुनील पाल यांनी अनेक कॉमेडी शो आणि चित्रपटांतून स्वतःची ठसा उमटवली होती. मात्र सध्या त्यांचा लूक पाहून चाहतेही गोंधळून गेले असून, त्यांना ओळखणं कठीण झाल्याची चर्चा रंगली आहे.
रेड कार्पेटवरील व्हिडिओने वेधले लक्ष
कॉमेडी किंग कपिल शर्मा यांच्या ‘किस किसको प्यार करूं 2’ या चित्रपटाचा प्रीमियर नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला अनेक कलाकार उपस्थित होते. त्यामध्ये सुनील पाल यांचाही समावेश होता.
मात्र रेड कार्पेटवर त्यांचा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर खळबळ उडाली. अनेक नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करत, “हे खरंच सुनील पाल आहेत का?” असा सवाल केला. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
साधा लूक, बदललेली देहयष्टी
एकेकाळी ज्यांचे लाईव्ह शो प्रचंड गाजायचे, त्याच सुनील पाल यांचा सध्याचा अवतार पाहून अनेकांना धक्का बसला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ते निळ्या रंगाचा साधा शर्ट, डोक्यावर टोपी आणि पायात चप्पल घालून दिसत आहेत. त्यांची देहयष्टीही पूर्वीपेक्षा खूपच कमी झालेली जाणवते.
चाहत्यांची चिंता वाढली
सुनील पाल यांना अशा अवस्थेत पाहून चाहते अस्वस्थ झाले आहेत. “ते आजारी तर नाहीत ना?”, “कदाचित ते कठीण काळातून जात असावेत”, “त्यांची मानसिक स्थिती ठीक नाहीये असं वाटतं” अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
वादांनीही राहिले चर्चेत
गेल्या काही वर्षांत सुनील पाल विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहेत. बॉलिवूडमधील कलाकारांवर आणि चित्रपटांवर सातत्याने टीका करणे, वादग्रस्त वक्तव्ये आणि शिवीगाळ यामुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.







