मुंबई प्रतिनिधी :
दि. १६ डिसेंबर २०२५
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढलेली आहे. अनेक शहरांमध्ये तापमान १० अंशांपर्यंत घसरले होते. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील वातावरणात गारवा वाढला होता. मात्र आता या थंड वाऱ्यांची तीव्रता काहीशी कमी झाल्याने थंडीचा कडाका थोडा ओसरत आहे. तरीदेखील राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही गारठा जाणवत आहे.
मुंबईत रात्री गारवा, दिवसा उष्णता
सोमवारी रात्री मुंबईत किमान तापमान १६.९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. त्यामुळे रात्री आणि पहाटे गारठा जाणवत होता. मात्र हवामान खात्याच्या माहितीनुसार, दिवसा वातावरण उष्ण राहण्याची शक्यता असून कमाल तापमान ३४ अंशांपर्यंत जाऊ शकते.
१६ ते २१ डिसेंबर या कालावधीत मुंबईत आकाश स्वच्छ राहणार असून हवामान कोरडे राहील, असा अंदाज आहे. दरम्यान, मुंबईचा हवेचा दर्जा सुधारला असून AQI १११ नोंदवण्यात आला आहे, जो मध्यम स्तरात मोडतो.
इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत थंडी कमी
१६ डिसेंबर रोजी मुंबईत कमाल तापमान ३४ अंश, तर किमान तापमान १८ अंश राहील. १७ डिसेंबर रोजीही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असून किमान तापमान १९ अंशांपर्यंत जाईल. राज्यातील इतर भागांमध्ये थंडी अधिक जाणवत असली, तरी मुंबईत मात्र तिचा प्रभाव काहीसा कमी झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यात गारठा काही दिवस टिकणार
परभणी, धुळे, निफाड, पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर या भागांमध्ये किमान तापमान १० अंशांखाली नोंदवले गेले आहे. राज्यभरात तापमानात चढ-उतार सुरू असले, तरी आगामी काही दिवस महाराष्ट्रात थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.







