पुणे प्रतिनिधी :
दि. १६ डिसेंबर २०२५
पुणे महापालिकेच्या मुकुंदनगर–सॅलिसबरी पार्क प्रभाग क्रमांक २१ मध्ये यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. मागील निवडणुकीत भाजपने या प्रभागातील चारही जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र आगामी निवडणुकीत वाढलेली इच्छुकांची संख्या, आरक्षणातील बदल आणि संभाव्य स्वतंत्र लढती यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे भाजप आपले वर्चस्व कायम ठेवणार की गमावणार, याबाबत मतदारांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
या प्रभागाची लोकसंख्या ८० हजारांहून अधिक असून, प्रभागाचा विस्तार मोठा असल्याने उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. यंदा ‘अ’ गट अनुसूचित जाती, ‘ब’ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ‘क’ गट सर्वसाधारण (महिला) आणि ‘ड’ गट सर्वसाधारण प्रवर्ग असे आरक्षण जाहीर झाले आहे. स्थानिक वस्तीतील नागरिकांनी बैठका घेऊन स्थानिक उमेदवार देण्याची मागणीही पुढे आणली आहे.
महर्षीनगर, मुकुंदनगर, सॅलिसबरी पार्कसह परिसरात दाट लोकवस्ती आहे. सध्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी झाले असले तरी, यंदा राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती एकत्र लढल्यास भाजपच्या चार टर्मपासून नगरसेवक असलेल्या माजी लोकप्रतिनिधींना उमेदवारीबाबत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तर महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढले, तर भाजपसाठी हा प्रभाग पूर्वीसारखा सोपा राहणार नाही.
या प्रभागातून आनंद, मीरा सोसायटी, डायस प्लॉट, महावीर स्कूलच्या डाव्या बाजूचा लेन, प्रेमनगर आणि ऋतुराज सोसायटीचा काही भाग वगळण्यात आला आहे. उर्वरित भागात उच्चभ्रू सोसायट्या, पूरग्रस्त पुनर्वसनाच्या चाळी, आंबेडकरनगर तसेच औद्योगिक वसाहतींचा समावेश आहे.
भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शिवसेनेचे दोन्ही गट, काँग्रेस, मनसे आदी पक्षांच्या इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू करत मतदारांशी संपर्क वाढवला आहे. स्पर्धा वाढल्याने भाजपला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. तसेच माजी नगरसेवकांच्या विकासकामांचा हिशेबही मतदारांकडून तपासला जाणार आहे. मराठा आणि जैन समाजाची मोठी मतसंख्या असल्याने उमेदवार ठरवताना पक्षांना सामाजिक समीकरणे लक्षात घ्यावी लागणार आहेत.
अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून यापूर्वी निवडून आलेल्या भाजपच्या कविता वैरागे यावेळी आरक्षण नसल्याने अनुसूचित जाती प्रवर्गातून लढण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या समोर माजी नगरसेविका अनुसया चव्हाण यांचे आव्हान असणार आहे. या प्रवर्गातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि भाजपकडून अनेक इच्छुक रिंगणात उतरले आहेत.
सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भाजपच्या राजश्री शिळीमकर, मनीषा चोरबेले काँग्रेसकडून योगिता सुराणा, सीमा महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) श्वेता होनराव निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून भाजपचे प्रवीण चोरबेले हे निवडून आले होते. या वेळी श्रीनाथ भिमाले यांनी सर्वसाधारण गटातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच भाजपकडून आशिष गोयल, निखिल शिळीमकर, संजय गावडे, प्रसन्न वैरागे हे देखील इच्छुक आहेत. काँग्रेसकडून भरत सुराणा, सुरेश चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) संतोष नांगरे, दिनेश खराडे, राहुल गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) बाळासाहेब अटल, मोहसीन काझी, सागर कामठे, सचिन निगडे मनसेकडून मंगेश जाधव, सलीम सय्यद शिवसेनेकडून (ठाकरे गट) राजेंद्र शशिकांत शिळीमकर, ऋषभ नानावटी इच्छुक आहेत. शिवसेनेकडून (शिंदे गट) सुधीर नरवडे यांच्या नावाची चर्चा आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षित झाल्यामुळे माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांना सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढवावी लागणार आहे. या प्रवर्गातही भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून महिला उमेदवारांची नावे चर्चेत आहेत.
सर्वसाधारण महिला आणि पुरुष प्रवर्गातही भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेकडून इच्छुकांची मोठी यादी आहे. त्यामुळे या प्रभागात यंदा बहुरंगी आणि चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०१७ च्या निवडणुकीत भाजपने एकहाती यश मिळवले असले तरी, बदललेल्या आरक्षणामुळे आणि वाढलेल्या स्पर्धेमुळे यंदा निकाल वेगळा लागणार का, याकडे संपूर्ण प्रभागाचे लक्ष लागले आहे.






