पुणे प्रतिनिधी :
दि. १४ जानेवारी २०२६
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात असून, मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी १४ ते १६ जानेवारीदरम्यान विशेष वाहतूक नियोजन जाहीर केले आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असल्याने शहरातील अनेक भागांत सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत वाहतूक निर्बंध लागू राहणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रे, संभाव्य गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टीने काही प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात येणार असून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी, तसेच नागरिकांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचताना अडचण येऊ नये, यासाठी शहरातील सहा प्रमुख वाहतूक विभागांत बदल लागू करण्यात आले आहेत. या काळात काही ठिकाणी जड वाहने तसेच खाजगी वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे.
हडपसर परिसर
हडपसर भागात मतदान केंद्रांची संख्या अधिक असल्याने येथे मोठी गर्दी अपेक्षित आहे. साने गुरुजी परिसराकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद राहील. वाहनचालकांनी हडपसर वेस्ट अमरधाम स्मशानभूमी मार्ग, माळवाडी डी.पी. रोड किंवा हडपसर गाडीतळ येथून संजीवनी हॉस्पिटल डी.पी. रस्त्याने सिद्धेश्वर हॉटेलकडे जाणारा मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरेगाव पार्क परिसर
व्हीआयपी हालचाली आणि संवेदनशील मतदान केंद्रांमुळे कोरेगाव पार्कमधील अंतर्गत रस्त्यांवर कडक निर्बंध असतील. नॉर्थ मेन रोड (लेन ‘सी’) ते पाणीपुरवठा केंद्र, बंडगार्डन घाट तसेच महात्मा गांधी चौक ते मौलाना अबूल कलाम आझाद स्मारकाकडे जाणारे रस्ते बंद राहणार आहेत. पर्याय म्हणून कोरेगाव पार्क जंक्शन ते एबीसी फार्म हा मुख्य रस्ता खुला ठेवण्यात आला आहे.
समर्थ वाहतूक विभाग
पुणे स्टेशन व मध्यवर्ती पेठांना जोडणाऱ्या या भागातही मोठे बदल करण्यात आले आहेत. पॉवर हाऊस चौक ते बालाजी चौक, संत कबीर चौक ते क्वार्टर गेट चौक आणि रामोशी गेट ते जुना मोठा स्टँड हे मार्ग बंद राहतील. नागरिकांनी शांताई हॉटेल, बाहुबली चौक, क्वार्टर गेट चौक आणि ‘सेव्हन लव्हज’ चौक या मार्गांचा वापर करावा.
विमानतळ परिसर
फिनिक्स मॉलच्या मागील बाजूचा रस्ता, सॉलिटेअर इमारतीजवळील मार्ग तसेच निको गार्डन परिसरातील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील. वाहनचालकांना विमान नगर चौक, श्रीकृष्ण हॉटेल चौक आणि दत्त मंदिर चौक मार्गे प्रवास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विश्रामबाग व दत्तवाडी विभाग
विश्रामबाग परिसरात पुरम चौक ते टिळक चौकदरम्यान वाहतूक बंद राहील. या भागात जाण्यासाठी शास्त्री रस्ता आणि दांडेकर पूल हा पर्यायी मार्ग वापरावा लागेल.
दत्तवाडी भागात बाजीराव रस्त्यावरील सणस पुतळा ते ना. सी. फडके चौक तसेच सारसबाग खाऊ गल्ली मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. येथे वाहतूक अप्पा बळवंत चौक (ABC) आणि पुरम चौकातून वळवण्यात येणार आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना वेळेचे नियोजन करून प्रवास करण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून मतदानाचा हा लोकशाही उत्सव कोणत्याही अडथळ्याविना पार पडेल.






